Jalgaon News: राज्याच्या राजकारणात सध्या काही घडामोडी या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जेष्ठनेते एकनाथ खडसे (Eknatha Khadse) पुन्हा राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे. खडसे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा जोमाने सक्रिय झाले आहे. एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्याच्या राजकारणात आणि खास करून जळगावच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्याची मनिषा बाळगून असलेल्या खडसे आणि महाजन यांच्यातील वितुष्ट सर्वश्रुत आहे. तरी, आपल्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी खडसेंनी खास आपल्या स्वीय सहाय्यकांना थेट गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे पाठवून निमंत्रण दिले. नाथाभाऊंनी पुढे केलेला हात व दाखवलेला मोठेपणा याला गिरीश महाजन कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून असून या कार्यक्रमाच्या माध्यामातून दोघांचे मनोमिलन होते का? हे बघणे आता औस्तुक्याचे ठरणार आहे.
सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण
दरम्यान काही दिवसांपूर्वीच आ. एकनाथ खडसे हे विनोद तावडे यांना भेटले होते. त्यामुळे खडसे पुन्हा घरवापसी करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची देखील मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha)यांना भेटल्याचे खडसे यांनी सांगितले होते. त्यानंतर आता महाजनांशी मैत्रीचा हात पुढे केल्याने खडसेंच्या भाजपमधील ‘घरवापसीची’ ही तयारी तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मंत्री महाजन यांना निमंत्रण
मंत्री महाजन यांना ही बोलावण्यासाठी एकनाथ खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते आणि सुनील नेवे यांनी जामनेरला जाऊन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. तसेच अमृत महोत्सवी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका दिली. या अमृतमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती केली. महाजन यांनी ही स्मितहास्य देऊन उपस्थित राहण्याचे संकेत दिले. दरम्यान माध्यमांसमोर प्रतिक्रिया देतांना महाजन म्हणाले “सगळ्यांचा विषय वेगळा आणि माझा विषय वेगळा आहे.” असे मिश्कीलपणे हसत म्हणाले. मात्र महाजन जाणार की टाळणार याचे गूढ कायम आहे.
पारंपरिक विरोधक एकत्र येणार का?
दरम्यान, जळगाव म्हटले की, एकनाथ खडसे यांचा बालेकिला समजला जातो. मात्र मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी सूत्रे हातात घेतली आणि भाजपातून खडसे काहीसे मागे पडले. एके काळी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले खडसे यांची भाजपात घुसमट होत असल्याने त्यांनी अलीकडेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यादरम्यान गिरीश महाजन हे राज्यात भाजपासाठी संकामोचक म्हणून समोर आले. राज्यासह आपल्या होम ग्राऊंडवर देखील मंत्री महाजन यांनी आपले वर्चस्व दाखवले. त्यामुळे अधून-मधून खडसे आणि महाजन यांच्यात खटके उडत असे, त्यामुळे त्या दोघात फारसे सख्य नव्हते. जळगावमध्ये ते एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जात. त्यामुळे अचानक खडसे यांनी आपल्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे निमंत्रण महाजन यांना यांना पाठविल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. मात्र खडसे यांनी दाखवलेल्या मनाचा मोठेपणा हा चर्चेचा विषय असून या निमित्ताने खडसे आणि महाजन हे पुन्हा एकाच व्यासपीठावर येतात का? आणि मैत्रीचे नवे पर्व सुरू होते का? हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.








