Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात १२ ते १६ दरम्यान हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र, रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी हवामान कोरडे राहणार आहे. जळगावचे तापमान ३५,७ अंश सेल्सियस आज नोंदवले गेलं आहे. त्यामुळे वातावरणात असह्य उकाडा जाणवत आहे. ऐन पावसाळ्यात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. जुलै मध्यावर पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पावसाची गरज भासणार आहे. तसेच दमदार पाऊस न झाल्याने बऱ्याच ठिकाणी पेरण्या रखडल्या आहे. राज्यातही तशीच परिस्थिती आहे. काही भाग वगळा तर पावसाने सर्वत्र हुलकावणी दिली आहे.
राज्यात असे असेल हवामान
दरम्यान, दि. १२ आणि १३ जुलैला कोकण आणि गोव्यातील काही ठिकाणी, तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असूनच मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर, दि.१४ जुलैला कोकण आणि गोव्यातील काही ठिकाणी, तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. दरम्यान, जळगावनंतर सोलापूरला ३५.६ अंश तापमान आहे. मुंबईत आज ३२ ४ तापमानाची नोंद झाले आहे. राज्यात उष्णतेच्या झळा नसल्या तरी हवेत उष्मा जाणवत आहे. राज्यातील काही भागात दोन दिवस कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज आहे.
तसेच दि.१५ जुलै रोजी कोकण आणि गोव्यात अनेक ठिकाणी तर, विदर्भात काही ठिकाणी, तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दि.१६ जुलैला कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी; विदर्भात काही ठिकाणी; तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली आहे.
हवामान विभागाचा इशारा
दि. १२ ते १४ जुलै दरम्यान हवामान विभागाचा कोणताही इशारा नाही. काही ठिकाणी हवामान कोरडे राहणार आहे. तर, काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे, मात्र, दि.१५ आणि १६ जुलै रोजी विदर्भातील तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ३०-४० किमी वेग) वादळ होण्याची शक्यता आहे. राज्यभर हवामान विभागाने ग्रीन अलर्ट दिला आहे. म्हणजेच हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.

राज्यातील प्रमुख जिल्ह्याचे (अंश सेल्सियस) असलेले तापमान
मुंबई ३२.४
नागपूर ३४.२
पुणे ३०.६
संभाजीनगर ३२.८
नाशिक ३०.१
कोल्हापूर २९.५
सोलापूर ३५.६
रत्नागिरी ३२.०
सातारा २९.९
सांगली ३१.४
मालेगाव ३३.०
जळगाव ३५.७
परभणी ३३.५
अकोला ३४.५
पणजी ३२.४








