Latest Weather News : जळगाव जिल्हयात १ जूनपासून आतापर्यंत १३७.० मिमी पाऊस झाला आहे. गत वर्षी याच दरम्यान १८३ मिमी इतका पाऊस झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाला आहे. शेती पिकांना पाऊस आवश्यक आहे. येत्या काही दिवसात पाऊस झाला नाही. तर पिकांचा आणि पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. गुरुवारी जळगावचे किमान तापमान २३ अंश सेल्सियस इतके होते. तापमान कमी असले तरी दिवसभर वातावरणात उकडा कायम आहे. आज देखील उकाडा जाणवत आहे. त्यामुळे जळगावकरांची उकाड्यापासून सुटका नाही. पुढे दि. १७ ते २१ जुलै दरम्यान हवामान खात्याने ग्रीन अलर्ट दिला आहे. त्यामुळॆ हलका- मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे. उकाड्याने हैराण असलेल्या जळगावकरांना सध्या तरी उकाड्यापासून सुटका नाही. शेतकरी देखील आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. मात्र हवामान खात्याने आणखी तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज दिला असल्याने पावसाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.
उत्तर महाराष्ट्रात हलका पाऊस
दरम्यान हवामान विभागाने धुळे, नंदुरबार, नाशिक आणि नाशिक घाटमाथा परिसर या ठिकाणी हलका मध्यम पावसासह विजेच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज दिला आहे. अहिल्यानगर येथे ग्रीन अलर्ट दिला आहे. त्यामुळे जवळपास उत्तर महाराष्ट्रातून पाऊस गायब झाला असून मुसळधार पावसाची आत खरी गरज आहे. बळीराजा पावसाकडे आस लावून बसला आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही, त्यामुळे काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहे. तर ज्यांनी थोड्याफार पावसात पेरण्या केल्या आहे. त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे. शेतीचा खर्च देखील आता परवडत नाही, केलेल्या खर्चा एवढे उत्पन्न देईल की नाही, याची शाश्वती राहिली नाही.
दि. १७ ते २१ जुलै दरम्यान पावसाचा अंदाज असा
१६ जुलै: कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी; तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता.
१७ जुलै: कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी; तसेच मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता.
१८ जुलै: कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी; मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी; तसेच मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता.
१९ जुलै: कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी; विदर्भातील काही ठिकाणी; तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता.
२० जुलै: कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी; विदर्भातील अनेक ठिकाणी; तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता.

हवामान विभागाचा शेतकऱ्यांसाठी हा इशारा
१६ जुलै: कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (ताशी ४०-५० किमी) वाहण्याची शक्यता.
१७ जुलै: विदर्भातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता. महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (ताशी ४०-५० किमी) वाहण्याची शक्यता.
१८ जुलै: विदर्भातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (ताशी ४०-५० किमी) वाहण्याची शक्यता.
१९-२० जुलै: विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (ताशी ४०-५० किमी) वाहण्याची शक्यता.








