Amalner News: येथील नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष वारंवार भेटत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी नगरपरिषद कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले. नगराध्यक्षांची भेट न झाल्याने त्यांच्या कार्यालयातील खुर्चीला निवेदन चिटकवून शांततापूर्ण पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला.
भेट मिळत नसल्याबद्दल नाराजी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दुर्गेश पाटील (डीपी) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहरातील युवक, महिला व नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान नगराध्यक्षांशी वारंवार संपर्क साधूनही भेट मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असून, नागरिकांना भेटण्यासाठी वेळ न देणे योग्य नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
निवेदनातील विषय असा
यावेळी नगरपरिषद प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले. त्यामध्ये अमरधाम (स्मशानभूमी) येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. अमरधाममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षित वाहनतळ, सुसज्ज शोकसभागृह, एलईडी दिवे, पंखे, सार्वजनिक स्वच्छतागृह, लॉकर सुविधा, काँक्रीट पार्किंग, बोअरवेल व कायमस्वरूपी पाणीपुरवठा, वृक्षारोपण, नियमित स्वच्छता, बसण्याची व्यवस्था, हिरवळ, आकर्षक लँडस्केपिंग तसेच धार्मिक भजने व शांती मंत्रासाठी साउंड सिस्टीम अशा विविध सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित
तसेच प्रभाग क्रमांक ३ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासोबत आवश्यक गटाराचे बांधकाम करण्यात यावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली. पावसाचे व सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी श्री. अशोक बाबुलाल सोनवणे यांच्या घरापासून ते श्री. बापू सोमा भोई यांच्या घरापर्यंत तसेच दीपक भिल यांच्या घरापासून ते कलाबाई पाटील यांच्या घरापर्यंत गटार बांधण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधणे
यावेळी दुर्गेश पाटील (डीपी) यांनी सांगितले की, हे आंदोलन कोणाचाही अवमान करण्यासाठी नसून नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने करण्यात आले आहे. नगरपरिषद प्रशासनाने अमरधामच्या आधुनिकीकरणासह प्रभाग क्रमांक ३ मधील गटाराच्या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रविण (गुड्डू ) संताजीराव देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, दुर्गेश पाटील,डीपी ,भुषण लोहार, चेतन पवार,चेतन पाटील, कुणाल पाटील, सागर पाटील, ललित पाटील, कुशल पाटील, विवेक निकुम, अविनाश कुंभार, चिन्मय पाटील, मोहीत शिंदे, सतिश पाटील, शरद पाटील, हर्षल शिंपी, मनिषा पाटील,कोमल पाटील, शोभाबाई मिस्तरी, ठगूबाई मराठे, राजश्री धनगर भिकूबाई कोळी, ज्योती कुंभार, पार्वती मिस्तरी, ममताज रफिक, ऊषाबाई इदोरे, मंगळबाई पाटील कलाबाई पाटील, मीनाशी पाटील,बापू भोई, सागर लांडगे जिग्नेश पाटील, विशाल धनगर, हर्षल पाटील, जयेश पाटील, मनिष पाटील, पंकज पाटील यासह प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








