Jalgaon News: शहरातील जनरल अरुण वैद्य चौक (आकाशवाणी चौक) येथे भारतीय सैन्याचा सेवामुक्त रणगाडा उभारण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात मनसेतर्फे मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी सांगितले की, जनरल अरुण वैद्य हे भारतीय सैन्याच्या इतिहासातील पराक्रम, धैर्य आणि नेतृत्वाचे तेजस्वी पर्व आहेत. त्यांच्या नावाने असलेल्या चौकात रणगाडा उभारणे ही केवळ सजावट नसून राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक सैनिकाला वाहिलेली कृतज्ञ आदरांजली ठरेल.
या चौकाचे नामकरण झाल्यानंतर येथे दोन्ही बाजूंना दोन लहान तोफा बसविण्यात आल्या होत्या. त्या पाहून अनेकांना भारतीय सैन्याच्या पराक्रमाची आठवण होत असे. मात्र आज त्या तोफा नाहीत. त्यामुळे चौकाच्या नावाला साजेशी ओळख आणि प्रेरणादायी स्वरूपही हरवले आहे.

देशातील अनेक शहरांमध्ये सेवामुक्त रणगाडे, तोफा आणि लढाऊ विमाने सार्वजनिक ठिकाणी उभारून राष्ट्रप्रेमाची जाणीव जपली जाते. जळगावसारख्या ऐतिहासिक आणि वाढत्या शहरातही असे प्रेरणादायी स्मारक असणे ही काळाची गरज असल्याचे मनसेने म्हटले आहे.
मनसेने मनपा प्रशासनाला संरक्षण मंत्रालय आणि भारतीय सैन्याशी आवश्यक समन्वय साधून सेवामुक्त रणगाडा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाला निधी अथवा इतर कोणतीही अडचण असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसहभागातून निधी उभारून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत हा रणगाडा जळगावमध्ये आणण्यासाठी पुढाकार घेईल, अशी ठाम भूमिका ॲड. जमील देशपांडे यांनी मांडली.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष विनोद शिंदे,किरण तळले, उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम,श्रीकृष्ण मेंगडे , ललित शर्मा,चेतन पवार,शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, उपस्थित होते.








