दिगंबर मराठे/ राजरंग
Sharad Pawar Politics: शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सरकारमध्ये सामील होणार असल्याचे गुऱ्हाळ मंगळवारी दिवसभर सुरू होते. आता यात नेमके कारण, खरे काय आणि खोटे काय हे शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनाच माहीत. मात्र, ऐन ढगफुटीच्या इशाऱ्यात ही खुमासदार चर्चा चांगलीच रंगल्यानं जाणकारांच्या भुवया उंचावल्या होत्या, राजकीय धक्के आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या चर्चांमुळे महाराष्ट्र तसा अधूनमधून हादरत असतो. अमुक पक्षानं तमुक पक्षाचे तितके खासदार फोडले, गद्दार १०० कोटींमध्ये विकले गेले, आमदारांचा एक गट लवकरच तमुक पक्षात प्रवेश करणार, वगैरे वगैरे स्वरूपाच्या त्या चर्चा असतात. अर्थात, वाढती महागाई असो की, त्यासारख्या समस्या घेऊन दररोजच आयुष्य जगण्यासाठी धडपड करणाऱ्या सामान्य जनतेला या चर्चांचे फारसे सोयरसुतक नसावे, कारण तो त्याचा प्रांत नाही पण, तरीही ‘फुटी’ हा शब्द जणू त्याच्या जीवनाशी जुळला की काय, असे आता वाटायला लागले आहे.
पेपर फुटी ,खासदार फुटीनंतर मंगळवारी ढग फुटी होणार या इशाऱ्याने पुन्हा एकदा त्याचा फुटी या शब्दाशी संबंध आला. असो, ठाकरे सेनेप्रमाणे शरद पवार यांचेही खासदार फुटणार अशी चर्चा मध्यंतरी सुरू होती, पण तशी हालचाल अजून काही दिसून येत नाही. त्यात नाशिकमधून ठाकरे गटाचे १२ नगरसेवक आणि आमदार फुटीच्या चर्चेने राजकीय वातावरण आणखी तापले आणि ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा सुरू झाली. राज्यसभेत आपला आकडा वाढवण्यासाठी भाजपचे चाणक्य बंगाल आणि महाराष्ट्रात ऑपरेशन करत असल्याचे सांगण्यात येते. एकनाथ शिंदे हे अमित शहा यांचे विश्वासू असल्याने महाराष्ट्रात ऑपरेशन राबविल्याचे सांगितले जाते.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या एक-दोन दिवसांपासून या घडणाऱ्या घडामोडीनेे सर्वांचे लक्ष वेधले, आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिवेशन काळात त्यांच्या दालनाला भेट दिली. पवारांच्या या गुगलीने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या, त्यानंतर ही बेळगावच्या मुद्द्यावरील बैठकीसाठी पवार आल्याचे सांगण्यात आले. मात्र दुसरीकडे संभाव्य फूट रोखण्यासाठी तर नव्हे ना? असा तर्क ही लढवला गेला. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार पक्षाची अवस्था उध्दव ठाकरे यांच्या पक्षासारखी होईल, असे केलेले विधान राजकीय वर्तुळात आणखी चर्चेला उधाण देणारे ठरले. त्यातच शिंदे यांची भेट घेतल्याने संजय राऊत यांची प्रतिक्रीया आली. शिंदेंना गद्दार म्हणून हिणवत ‘मविआ’तील ठाकरे सेनेते या भेटीने नाराजी दिसली. ऑपरेशन टायगरनंतर घेतलेल्या या भेटीचा टायमिंग महत्वाचा आहे. येत्या काही दिवसात मोठी घडामोड घडते का? हा राजकीय औसुक्याचा विषय बनला असतांनाच पवार भाजपशी हातमिळवणी करून सत्तेत सहभागी होतील, अशी चर्चा जोरात सुरू झाली आहे. पवारांच्या मनात काय चालले? याचा ठाव घेणे आज ही अवघड आहे. ५० वर्षाहून अधिक काळ आपल्या राजकीय प्रवासात त्यांनी भल्या भल्यांना राजकीय गुगली टाकून कुणाला चकवा तर कुणाची दांडी गुल केली असेल हे न सांगितलेले बरे..
पवार भाजपशी हातमिळवणी करतील याची शक्यता सध्या तरी दिसत नसली तरी प्रेमात – युद्धात आणि आता राजकरणात काही होऊ शकते, हे गेल्या काही वर्षात दिसून आले. राजकारण कोणत्या दिशेला चालले आहे, हे जनतेला अस्वस्थ करणारे आहे. पण, सध्या तशी हालचाल अजून काही दिसून येत नाही. त्याआधी शरद पवार यांची राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरू होती, परंतु ती चर्चाच ठरली. हे थोडे होत की काय, नाशिकमध्ये ढगफुटी होणार असल्याची चर्चा मंगळवारी रंगली होती, त्याचवेळी ढगफुटीच्या वातावरणात शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला होता. पवार यांनी एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यावर ही जबाबदारी सोपवली असल्याचेही बोलले गेले खरे तर, राजकारणात कधी काय होईल याचा काहीही भरवसा नाही.
शिवाय कोणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्रही नसतो. आमदार- खासदार एका रात्रीत दुसऱ्या पक्षात कधी उडी मारतील, हेही कोणी सांगू शकत नाही..किंबहुना, कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता आमचा आमदार खासदार नगरसेवक कधीही फुटू शकत नाही, हे आज तरी छातीठोकपणे सांगू शकत नाही. अलीकडच्या घडलेल्या राजकीय घडामोडींवरून तरी हेच सहज लक्षात येते, त्यात विषय शरद पवार यांचा असेल तर मग, ते कधी कोणता डाव टाकतील याचा नेम नाही. आता खरोखरच ते एनडीए सोबत जाणार का, ही चर्चा नजरेआड करून चालणार नाही, असे जाणकार सांगतात. तसेही रोहित पवार यांनी ही नुसती चर्चा असल्याचं पत्रकारांशी बोलताना म्हटलं तर सुप्रिया सुळे यांनी ही १२ वर्षांपासून चर्चा सुरू आहे, असे सांगून विषय टाळला, पण काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र राष्ट्रवादीमध्ये तशी चर्चा सुरू असल्याचं पत्रकारांना सांगितल्यानं सस्पेन्स वाढला आहे.











