Road Accident News: महिनाभरापूर्वीच थाटामाटात लग्न झालेल्या नवविवाहीत जोडप्यावर काळाने घाला घातला. विवाहानंतर नव्या आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत घेऊन पत्नीसोबत गोव्याला फिरायला गेलेल्या जोडप्यावर अपघातात दुर्दैवी प्रसंग ओढावला. सुखी संसाराची स्वप्न मनाशी बाळगून असलेले अनस कुरेशी गोव्याहून परत येत असताना परतीच्या प्रवासात एका क्षणात होत्या च नव्हतं झालं. रत्नागिरीतील या भीषण अपघातात त्याने पत्नी, आई, लाडका भाचा आणि कुटुंबाचा विश्वासू चालक गमावला.
मुंबई सेंट्रल येथील दूधवाला कॉप्लेक्समधील रहीवासी अनस याचा महिनाभपुर्वी फिजासोबत मोठ्या थाटात विवाह पार पडला होता. लग्नानंतर अनस हा पत्नी आई, भाचा यांच्यासोबत फिरायाला गोवा गेला होता. ते कुटुंबाचा विश्वासू चालक मुस्तफाला घेत ते गोव्याला गेले. गोव्याहून हे कुटुंब बुधवारी मुंबईकडे परतत असताना रत्नागिरी जिल्ह्यात भरधाव डम्परने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली आणि काही क्षणांत सर्व काही उद्ध्वस्त झाले.

अपघातानंतर जखमींना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी अनसची पत्नी फिजा, आई यास्मिन, भाचा आणि चालक मुस्तफा यांना मृत घोषित केले. या भीषण दुर्घटनेत अनस एकटाच बचावला असून त्याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अनसने यापूर्वीच वडिलांचे छत्र गमावले होते. सुमारे १५ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते.
तिघे गाडीबाहेर फेकले गेले
हा अपघात इतका भीषण होता की, गाडीतील यास्मिन, त्यांचा मुलगा आणि सून हे तिघेजण गाडीच्या बाहेर फेकले गेले. त्यातील यास्मिन आणि त्यांची सून फिजा यांचा जागीच मृत्यू झाला तर पुढील सीटवर बसलेला (यास्मिन यांचा भाचा) इस्लाम कुरेशी आणि चालक गाडीतच अडकून पडले होते. पोलिस, नागरिक तसेच डॉ. स्वरुप एकलुरे यांनी गाडीचे पत्रे कापून त्यांना बाहेर काढले.










