Mumbai News: राज्यात सध्या नाशिकचा वादग्रस्त ‘कॅप्टन’ अशोक खरातचे प्रकरण गाजत आहे. अशोक खरात सोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव जोडले जात आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. रुपाली चाकणकर यांच्या या प्रकरणामुळे अडचणी वाढल्या आहे. चाकणकर यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या पदावरही आता टांगती तलवार आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वरिष्ठ नेत्यांची येत्या दोन दिवसांत एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत चाकणकर यांची बाजू ऐकून घेऊनच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, अशोक खरातच्या या प्रकरणावर अनेक संतापजनक प्रतिक्रिया येत आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) एका वरिष्ठ नेत्याने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ते म्हणाले, राजकारणात प्रत्येक वेळी आरोप होत राहतील आणि जुने-नवे फोटो समोर येत राहतील. पण केवळ फोटो आले किंवा कोणी आरोप केले म्हणून तातडीने राजीनामा घ्यायचाच का? आरोपांची सत्यता आणि कायद्याच्या चौकटीत झालेली चौकशी यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. या दोन दिवसांतील बैठकीनंतर रुपाली चाकणकर यांच्याबाबत मोठा निर्णय होण्याचे संकेतही या नेत्याने दिले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा नेमका किती आणि कसा सहभाग आहे, याची शहानिशा पक्षपातळीवर केली जाईल. केवळ आरोपांच्या आधारे कारवाई करण्याऐवजी, स्वतः रुपाली चाकणकर यांचे या प्रकरणावर काय म्हणणे आहे, हे वरिष्ठ नेते जाणून घेतील. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडिओ हे केवळ राजकीय हेतुने प्रेरित आहेत की त्यात तथ्य आहे, याचीही पडताळणी केली जाणार आहे.
काय आहे प्रकरण?
नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीत नाशिक शहरातील कॅनडा येथील एका इमारतीमध्ये खरात याच्या कार्यालयात आपल्यावर अत्याचार झाल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. खरात याने फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कार्यालयात बोलावून तिला गुंगीकारक पदार्थमिश्रित पाणी पाजले. संमोहित अवस्थेत २ पीडिता गेल्यानंतर तिला तिच्या पतीच्या मृत्यूची भीती घालून आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन खरातने वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.











