Nashik News: एआय हा विषय वाटतो तेवढा क्लिष्ट नाही. तसाच तो नवीनदेखील नाही. त्यामुळे तो भविष्यात आपले जगणे व्यापणार असले तरी त्याला घाबरण्याची गरज नाही. एआयच्या आधी कंप्युटर प्रोग्रामिंग ही संकल्पना होती. त्यावर जर आपण मात करू शकलो, सदसद्विवेकबुद्धीने तंत्रज्ञान वापरल्यास एआयसोबत सहजीवन शक्य, असे प्रतिपादन पुणे येथील कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ भूषण गरवारे यांनी येथे केले.
नाशिकची तब्बल 103 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमालेत गरवारे यांनी स्व. कांताबेन रसिकलाल शाह स्मृती व्याखानाच्या निमित्ताने 23 वे पुष्प गुंफले. यावेळी त्यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मी, संघर्ष की सहजीवन’ या विषयावर मार्गदर्शन केले. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. कांताबेन शाह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. ब्रिजकुमार परिहार यांनी स्वागत केले.
व्याख्यानमालेनिमित्त राबविण्यात येत असलेल्या चित्र प्रदर्शनाच्या उपक्रमात आज कलानिकेतन महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्राजक्ता वर्मा हिच्या चित्रकृती मांडण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने व्यक्तीचित्रांसोबतच अन्य चित्रांचाही समावेश होता. विशेष म्हणजे ही केवळ रेखाचीत्रे नसून ती आकर्षक रंगसंगतीत सजवलेली असल्याने रसिक नाशिककरांनी या चित्र प्रदर्शनाचे कौतुक केले. चित्रकार प्राजक्ता यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

गरवारे म्हणाले की, एआय हा विषय वाटतो तितका क्लिष्ट निश्चितच नाही, असे सांगत त्यांनी एआयचा थोडक्यात इतिहास, सद्यस्थिती, भविष्य अशा अंगाने हा विषय मांडला. ते म्हणाले की, आज विजेबाबत जी परिस्थिती आहे, तीच येत्या काळात एआयबाबत होणार आहे. एवढे हा एआय आपले जीवन व्यापणार आहे. याची सुरुवात 1955 मध्ये झाली आणि 1997 साली लोकांना याची जाणीव झाली, जेव्हा संगणकाने बुद्धिबळच्या ग्रँडमास्टरला हरवलं. त्यानंतर ड्रायव्हरलेस कार, जेपर्डी, अल्फा गो यासारख्या स्पर्धा आदी या एआयच्या पुढील पायऱ्या असल्याचे सांगत एआय हे नवीन नसल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे एआयही संकल्पना लक्षात आल्यानंतर या क्षेत्रात प्रचंड वेगाने काम सुरू झाले आहे. विशेषतः आपल्या देशात आरोग्याच्या बाबतीत या एआयचा खूप मोठा लाभ होणार असून यातील विविध अप्लीकेशन भारतासाठी वरदान ठरणार आहे. शिक्षण, कृषी, क्रीडा, जाहिरात यासारख्या क्षेत्रांतदेखील ते वरदान ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे एआयमुळे नोकऱ्यावर गदा येईल ही भीतीदेखील निरर्थक असल्याचे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. नोकऱ्या जाणार नाहीत तर त्यांचे केवळ स्वरूप बदलेल. त्यासाठी आपल्याला तंत्रज्ञान शिकून घ्यावे लागेल. त्याचवेळी या व्यतिरिक्त डीप फेकसारखे अन्य काही धोके मात्र निश्चितच असल्याचे सांगत त्यांनी एआयच्या भविष्याचाही वेध घेतला.
‘मायबोली साजिरी..’ ने मांडला मराठी मनाचा कँनव्हास
दरम्यान, व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रांत आज गाण्यांच्या कार्यक्रमाऐवजी मेघा विश्वास प्रस्तुत ‘मायबोली साजिरी मराठी- मनाचा कँनव्हास’ हा मायमराठीची थोरवी अधोरेखित करणारा एक आगळावेगळा मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये अभिजात मराठीच्या गोडव्यापासून तर मराठमोळी वाद्य संस्कृतीपर्यंत विविध प्रकारचे कलाविष्कार सादर करण्यात आले. संजीव धुरी, मानसी गर्गे, समीर सुमन, अंशुमान गद्रे, शशांक पडवळ, वरून देवरे आणि मेघा विश्वास यांनी यामध्ये सहभाग घेतला. सूत्रधार म्हणून अनुराग गर्गे यांनी, तर रंगमंच व्यवस्थापणाची जबाबदारी नीरज रायकर यांनी सांभाळली.







