Nashik News: मनाचं कार्य मेंदूत चालतं. मन हे विचार, भावना, आठवणी, कल्पना, निर्णय आणि जाणीव यांचा एकत्रित अनुभव आहे. बुद्धिजीवी माणूस हा डाव्या मेंदूने काम करतात. तर अन्य सर्वप्रकारच्या कामांसाठी उजव्या मेंदूचा वापर करावा लागतो. त्यामुळे आपण एकाचवेळी दोन्ही मेंदूचा वापर केला तर आपले मन आणि मेंदू सक्रिय राहू शकतात. तसेच परिस्थितीचा स्वीकार करता आला पाहिजे हाच मन प्रसन्न ठेवण्याचा सोपा मार्ग आहे. असे प्रतिपादन धुळे येथील प्रा. वैशाली पाटील यांनी येथे केले.

तब्बल 103 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेत स्व. रमेश केंगे स्मृती व्याख्यानात त्यांनी ‘मन प्रसन्न तर जीवन प्रसन्न’ या विषयावर आपले विचार मांडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. परिक्षित केंगे व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. रमेश केंगे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. मनीष सानप व अँड. भानुदास शौचे यांनी स्वागत केले. दरम्यान, व्याख्यानमालेतर्फे यंदापासून सुरू करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाच्या उपक्रमात संदीप भडगावकर यांच्या चित्रकृती मांडण्यात आल्या. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
त्या म्हणाल्या की, महिलांमध्ये मुळातच सृजनशीलता असते. महिला आणि पुरुषांच्या दृष्टीकोनात बदल असल्याचे सांगत त्यांनी स्त्रियांची महती विशद केली. सुरुवातीला त्यांनी तत्वज्ञान आणि मानसशास्त्राच्या अंगाने मन ही संकल्पना स्पष्ट केली. मेंदूच्या भावनिक आणि वैचारिक वयात कोट्यवधी वर्षांची तफावत असल्याचेही त्यांनी सांगितले. मनाचे कार्य मेंदूत चालते; पण आपल्याला वाटतं ते हृदयात आहे. यामुळे अनेक मानसिक आजार होतात. समस्या कळत नसल्याने समाजात भोंदूगिरी, अंधश्रद्धा पसरत असते. सगळा खेळ हा मनावर अवलंबुन असतो. आपण जसा विचार करतो तसेच घडते. त्यातूनच आपला आत्मविश्वास दृढ होतो.
या संदर्भात त्यांनी छत्रपती शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केल्याचे उदाहरण दिले. तसेच यामागची मानसशास्त्रीय कारणंही सांगितली. दिवसाची सुरुवात आपण संगीत ऐकुन किंवा गाणे गावुन केल्यास मेंदूच्या लहरी आपल्या संपूर्ण दिवसाच्या विचारांवर प्रभाव टाकतात. तसेच रात्री झोपताना आपण जो विचार करतो, त्यावर आपला सबकौंशियस मेंदु काम करतो आणि आपल्या विचारांवर त्याचाही प्रभाव पडतो. यावेळी त्यांनी अल्फा, बिटा, थिटा, गामा, डेल्टा अशा मेंदूच्या लहरी व त्यांचे प्रकार आणि कार्य याबाबतही उदाहरणांसह विवेचन केले. रामायण जसं आपल्याला आदर्शवाद शिकवतं, तसच महाभारत व्यवहारवाद शिकवतो. या दोन्हीचा सुवर्णमध्य साधता आला पाहिजे.
कथ्थकवरील अनोखा कार्यक्रम ‘कथक के रंग’
व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रांत गौरी औरंगाबादकर प्रस्तुत ‘कथक के रंग’ हा कथ्थक नृत्याचे विविध पैलु मांडणारा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये अभिव्यक्ती, सोलो, नृत्य संरचना आदींच्या माध्यमातून कथ्थक हा अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम असल्याचे दर्शविण्यात आले. या विशेष सादरीकरणातून रसिकांनी कथ्थकची जादू अनुभवली. त्याचबरोबर कला, संस्कृती आणि संस्कार यांची सशक्त सांगड घालत त्या माध्यमातून कथ्थकचे विविध रंग दर्शविण्यात आले.









