Maharashtra Weather : जळगावसह सात जिल्ह्यात पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, अहिल्यानगर, नंदूरबार, जळगाव, धुळे, नाशिक आदी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागानुसार, प्रामुख्याने पुढील तीन दिवस दुपारी ४ वाजेनंतर अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावेल. काही ठिकाणी हा पाऊस तुरळक असेल, तर काही ठिकाणी अचानक ढगफुटीसारखा जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
विशेषतः या काळात वाऱ्याचा वेग ४० – किमी प्रतितास इतका राहू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. ज्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
नेमकी ही स्थिती का निर्माण झाली?
हवामानातील बदल : सध्याच्या अवकाळी पावसामागे जागतिक हवामानातील मोठे बदल कारणीभूत असल्याचे हवामान तज्ज्ञ यांनी सांगितले.
समुद्राचे तापमान : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान वाढल्याने मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण झाले आहे.
बाष्पयुक्त ढंग : बाष्पाचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यात ढगांची दाटी होत आहे. यामुळे अवकाळीची स्थिती निर्माण होत आहे.
पश्चिमी विक्षोभ : उत्तरेकडून येणारा पश्चिमी विक्षोभसक्रिय झाल्याने ही स्थिती निर्माण झाली असून, याचा प्रभाव पुढील आठवड्यापर्यंत कायम राहू शकतो.









