Jalgaon News: येणाऱ्या काळात मनसेचे संघटन तळागाळापर्यंत मजबूत करण्यावर देऊन सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात राबवावी, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन राणे यानी केले आहे. या प्रसंगी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बैठक झाली त्याप्रसंगी ते बोलत होते.. या बैठकीस जळगाव जिल्ह्यातील तालुका, शहर व ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान पक्ष संघटन, सभासद नोंदणी, स्थानिक प्रश्न तसेच आगामी निवडणुकांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना राणे यांनी सकारात्मक व स्पष्ट उत्तरे देत पुढील कामकाजाची दिशा दिली.
तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने इच्छुक उमेदवार व स्थानिक तयारीबाबतचे सविस्तर अहवाल तातडीने संपर्क अध्यक्षांकडे सादर करावेत, असे निर्देश दिले. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत मार्फत होणाऱ्या ग्रामसभांना नियमित उपस्थित राहणे अत्यावश्यक असून, गावपातळीवरील प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. दरम्यान, दि. २९ मार्च रोजी गजानन राणे हे भुसावळ, रावेर, यावल आणि चोपडा विधानसभा मतदारसंघात दौरा करून ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
बैठकीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी विश्रामगृहात येऊन गजानन राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीमुळे राजकीय पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू आहे..या बैठकीमुळे जळगाव जिल्ह्यात मनसेच्या संघटनेला नवी ऊर्जा मिळाली असून, आगामी काळात पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक. संजय नन्नवरे, एरंडोल तालुका अध्यक्ष विशाल सोनार, जामनेर तालुकाध्यक्ष अशोक पाटील, जळगाव शहराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळले, उप शहराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार, विभाग अध्यक्ष उमेश आठरे, विशाल जाधव, शाखाध्यक्ष अशोक खाटीक, खुशाल ठाकूर, राहुल चव्हाण, ऐश्वर्या श्रीरामे, साजन पाटील, दीपक राठोड, प्रकाश झोपे, जितेंद्र पाटील, संदीप मांडोळे, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष, प्रदीप पाटील, हर्षल वाणी आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते,






