महापौरांचे आयुक्तांना पत्र; तत्काळ अंमलबजावणीचे आदेश
Jalgaon Water Supply: जळगावकरांसाठी एक महत्त्वाची खूशखबर आहे. पाणीपुरवठ्यासंदर्भात ही आनंदाची बातमी असून उन्हाळ्यात पाण्याच्या वाढत्या गरजांचा विचार करून महापौर दीपमाला काळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना पत्र दिले आहे. या पत्राद्वारे महापौरांनी शहरात दोन दिवसांआडऐवजी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापौरांच्या या निर्णयामुळे ऐन उन्हाळ्यात जळगावकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जळगावकरांना सध्या दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. अमृत योजनेंतर्गत ज्या प्रभागांमध्ये जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे, त्या भागात पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने एक दिवसाआड पुरवठा शक्य आहे. असे असताना देखील शहरात सर्वत्र दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. आशात शहरातील अनेक भागातून नागरिकांकडून पाणी पुरवठ्याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. या तक्रारींची दखल घेत महापौरांना पत्राद्वारे आयुक्तांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या सुचना दिल्या आहे. तसेच याची तत्काळ पाणीपुरवठा विभागाला अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
भविष्यात 24 तास पाणीपुरवठा
महापालिकेचे दीर्घकालीन नियोजन अमृत 2.0 योजनेशी जोडलेले आहे. या योजनेंतर्गत 90 हजार वॉटर मीटर खरेदी करण्याची तरतूद करण्यात आली आहे. वॉटर मीटर बसल्यानंतर शहरात 24 तास पाणीपुरवठा शक्य होईल. जळगावकरांना 24 तास पाणीपुरवठ्यासाठी दोन ते तीन वर्ष वाट बघावी लागणार आहे.
‘वाघूर’मध्ये 86 टक्के जलसाठा
जळगाव शहराला वाघूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणातून दररोज 90 दशलक्ष लिटर पाण्याची उचल केली जाते. त्यापैकी 75 दशलक्ष लिटर पाणी फिल्टर करून नागरिकांना पुरवले जाते. सध्या धरणात 86 टक्के जलसाठा शिल्लक आहे.








