Nashik News: मोठी स्वप्नं बघुन आणि ठाम निर्णयाची कास धरून यशस्वी होता येतं. या मार्गात संघर्ष खडतर असला, तरी न डगमगता तब्बल 60 निर्मात्यांना भेटलो. निराशेची वेळ आलेली असतानाही परतीचे दोर कापून स्वतः धाडस केल्यानेच ‘तेंडल्या’सारखा चित्रपट बनवला अन् माझे स्वप्न पूर्ण झाले. हा प्रवास आणि ही जिद्द म्हणजेच तेंडल्याची कहाणी आहे. तसेच चांगल्या कामाचा ध्यास आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर सद्भावना आपोआप आपल्या पाठीशी उभ्या राहतात. असे प्रतिपादन तेंडल्या या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन जाधव यांनी येथे केले.
नाशिक वसंत व्याख्यानमालेच्या 103 वर्षांच्या गौरवशाली परंपरेत स्व. अण्णासाहेब वैशंपायन स्मृती व्याखानात ते ‘स्वप्नांचा पाठलाग करताना’ या विषयावर बोलत होते. पुष्करशेठ वैशंपायन व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. अण्णासाहेब वैशंपायन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष प्रा.संगीता बाफणा व सरचिटणीस हेमंत देवरे यांनी स्वागत केले.

दरम्यान, व्याख्यानमालेनिमित्त यंदा प्रथमच राबविण्यात येत असलेल्या चित्र प्रदर्शनाच्या उपक्रमात आज नाशिकच्या कलानिकेतन महाविद्यालयातील ए. टी. डी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी आपले कलाविष्कार सादर करत रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली. यामध्ये वर्ग शिक्षिका भाविका डांगे व विशाखा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यश गायकवाड, दिव्या आंबेकर, आर्या शेट्टी, दिव्या राठोड, साक्षी बैरागी, वैष्णवी निलवर्ण, हर्ष वाल्मिकी, रिद्धी पालिवाल, राधिका जोशी, ओम पाटील, तीर्था पवार, आदी 26 विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विविध शैलीतील या कलाकृती रसिक नाशिककरांना मनापासून आवडल्या. सहभागी विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान, चित्रपट बनवणं ही लढाई आहे. चांगला चित्रपट बनवणे हे युद्ध आहे. तर कमी बजेटमध्ये चांगला चित्रपट बनविणे म्हणजे महायुद्ध असते, असे सांगत जाधव यांनी तेंडल्याच्या निर्मिती प्रक्रियेतील अनेक अडथळे, गमतीजमती, अटातटीचे प्रसंग आदींच्या माध्यमातून आपला प्रवास मांडला. जाधव म्हणाले की, हल्लीच्या मुलांना स्वप्न बघायची सवयच राहिलेली नाही. मी मात्र लहानपणापासूनच मोठी स्वप्नं बघत होतो. विशेषतः मला सचिन तेंडुलकरसारखा महान खेळाडू व्हायचे होते. पण परिस्थितीमुळे क्रिकेट सोडावे लागले. मी स्पर्धा परीक्षांकडे वळलो. त्यात यशस्वी होत असताना मुलाखतीची तयारी करत होतो. त्याच वेळी सचिनने एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्या दिवशी अत्यंत भावुक होऊन रात्रभर विचार केला आणि पहाटे कधीतरी स्पर्धा परीक्षा सोडून सचिनला गिफ्ट देण्यासाठी चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला.
घरी कुणालाही न सांगता चित्रपटनिर्मितीचे काम सुरू केले. या निर्णयावर ठाम राहून, कुठलीही पार्श्वभूमी नसताना या मार्गावर संघर्ष करू लागलो. निर्माते, कलावंत, संगीत आदी तांत्रिक बाजु सांभाळणारी टीम शोधणे ही देखील तारेवरची कसरत ठरली. त्यानंतरचा संपूर्ण प्रवास त्यांनी रंजक पद्धतीने उलगडून दाखवला. नवीन टीम, पैशांची चणचण, सर्वच प्रकारची जुळवाजुळव, शूटिंगमधील अडथळे, मोठ्या कलावंताच्या डेट मिळवताना झालेली घालमेल आदींचा हा प्रवास म्हणजे धाडस आणि जिद्दीची कहाणी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘भावस्पर्शी’ मनोरंजन
दरम्यान, व्याख्यानमालेच्या सत्रांत आज सूरज, रसिका आणि आदित्य प्रस्तुत ‘भावस्पर्श’ हा लोकप्रिय हिंदी-मराठी गितांचा अत्यंत भावपूर्ण असा संगितमय कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये सुनेत्रा मांडवगणे यांनी अत्यंत खूमासदार निवेदनाद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवले. तर सूरज बारी व रसिका नातू यांनी आपल्या कसदार आवाजात मनाला भिडणारी विविध गाणी सादर केली. त्यांना आदित्य कुलकर्णी (तबला), देवराज दिवटे (ढोलक व हँडसोनीक), चैतन्य पाळेकर (ऑक्टोपँड), अनोश आढाव (कीबोर्ड) आणि भावेश राणे (गिटार) यांनी संगितसाथ केली.







