Jalgaon News : सततच्या नैसर्गिक आपत्ती, संकट, नापिकीसह कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील १३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अर्थात शासनाकडून आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये अनुदान प्रस्तावांना जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांकडून सादर झालेल्या १८ प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार १३ पात्र प्रस्तावांना जिल्हास्तरीय समि तीकडून मंजुरी देण्यात आली, तर अन्य चार प्रस्ताव योग्य पुरावे, कागदपत्रे अभावी नामंजूर करण्यात आले. एका प्रस्तावाची फेरचौकशी करण्याचा निर्णय या समितीने घेतला.
13 प्रस्तावांना मंजुरी
जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीच्या झालेल्या बैठकीत सर्वांत जास्त १३ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यात सुनील कैलास पाटील (सुमठाणे), प्रभाकर काळूसिंग परदेशी (अंबापिंप्री), युवराज नारायण पवार (टिटवी, ता. पारोळा), मोहन धनराज माळी (आडगाव), प्रेमचंद युवराज नन्नावरे (अनवर्दे खुर्द), संभाजी देवराम पाटील (मामलदे, ता. चोपडा), पंकज पौलाद धनगर (जळोद,ता. अमळनेर), ज्ञानेश्वर गोविंदा कोळी (सातोड, ता. मुक्ताईनगर), दगडू रतन पाटील (जवखेडेसिम, ता. एरंडोल), सूर्यभान दशरथ खवडे (नांद्रा हवेली), लाला जवरी चव्हाण (पिंपळगाव कमानी, ता. जामनेर), गोविंदा आबाजी पाटील (सांगवी खुर्द, ता. यावल), कुणाल कैलास जाधव (तारखेडा, ता. पाचोरा) या आत्महत्याग्रस्त १३ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.)








