America Iran War: अमेरिका, इस्रायल आणि इराण याच्यातील युद्धामुळे पश्चिम आशियात तणाव निर्माण झाला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात LPG चा तुटवडा निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहे. युद्धाची झळ सर्वच क्षेत्रांना बसत असताना आता शेतकऱ्यांच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता आहे. युद्धामुळे शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या युरिया खताच्या टंचाईचे संकट निर्माण होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. युद्धामुळे लिक्विड नॅचरल गॅस (LNG) पुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्याचा थेट फटका खत उत्पादन क्षेत्राला बसत आहे. त्यामुळे खरीप हंगामापूर्वी खताच्या टंचाईची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
युरिया हा खरीप हंगामातील प्रमुख खत असल्याने या टंचाईचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता आहे. युरिया खताच्या निर्मितीसाठी एलएनजी हा प्रमुख कच्चामाल म्हणून वापरला जातो. भारतातील 18 हून अधिक खत उत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणावर अखाती देश आणि रशिया येथून गॅस किंवा तयार युरियाची आयात करतात.
मात्र युद्धामुळे समुद्री वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे एलएनजीचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले असून, खत प्रकल्पांना गॅस पुरवठा कमी झाला आहे. परिणामी युरिया उत्पादनाची गती मंदावली आहे. युरियाचे उत्पादन घटल्यास बाजारात खताचा तुटवडा निर्माण होऊन दरवाढ होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया अॅग्रो इनपुट डीलर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कलंत्री यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, एलएनजी तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम होत असून, सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.











