Jalgaon News: चोरीच्या संशयातून मित्रानेच आपल्या मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मित्रावर चोरीचा संशय व्यक्त करत रागातून ही हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सदर घटना ही बोदवड शहरात घडली. या घटनेतील आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह मृतकाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. आ. चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करत या प्रकरणी कारवाईची मागणी केली. हत्येपूर्वी आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून हत्येबाबत सूचक पोस्ट ठेवली होती, त्यांनतर अन्सारचा खून केल्याचा आरोप मृत अन्सारच्या नातेवाईकांनी केला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे चोरीच्या संशयातून मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून हत्या केली. मृतक अन्सार पिंजारी यांनी मित्र अरबाज शाहवर चोरीचा संशय व्यक्त केला होता. घटनेनंतर आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करत बोडवड पोलीस ठाण्यासमोर मृतांच्या नातेवाईक आणि स्थानिकांनी निदर्शने केली तसेच पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
घटना अशी आहे
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अन्सार पिंजारीच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. या चोरीत आपला मित्र अरबाज शाह याचा सहभाग असल्याचा त्याला दाट संशय होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला, वाढ इतका वाढला की, आरोपीने अन्सारला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच हत्येपूर्वी आरोपीने सोशल माध्यमात स्टेट्स लावून मित्राचा गेम करणार असल्याचे सूचक पोस्ट ठेवली होती, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर आरोपीने अन्सार पिंजारीवर चाकूने वार केले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. त्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली,
पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर अन्सारचा जीव वाचला असता, अखेर संतप्त नातेवाईकांनी आणि आ.चंद्रकांत पाटील यांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू केले. या घटनेनंतर आ. चंद्रकांत पाटील यांनी या घटनेची माहिती थेट मुख्यमंत्र्यांना दिली त्यांनी, आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करत पोलिसांच्या हलगर्जीपणाचा पाढाच वाचला. याप्रकरणी एपीआय आणि एका कॉस्टेबलला निलंबित करण्यात आले. पुढील तपास बोदवड पोलिस करत असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.







