Jalgaon News: जिल्ह्यात वादळीवारे हे ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहिले होते, या वादळी वाऱ्यासह, गारपीट आणि मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील काही भागांना झोडपले असून, यात रावेरसह यावल, मुक्ताईनगर व इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची एक आढावा बैठक घेऊन महसूल, कृषी विभाग आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना आवश्यक सूचना दिल्या, तसेच शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्यास सांगितले. यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यात झालेल्या वादळीवारा आणि पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे, मात्र नुकसानीची माहिती ऑनलाईन प्रणालीद्वारे भरतांना काही तांत्रिक अडचणी येत आहे, याबाबत तक्रारी आल्या असून काही ठिकाणी मोबाईल नेटवर्कची समस्या आहे, तर काही ठिकाणी पीक विमा पोर्टलवर माहिती अपलोड करण्यात अडचणी निर्माण होत आहे. या सर्व प्रकारांची त्यांनी गंभीर दखल मंत्री खडसे यांनी घेतली असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनाआणि विभागांना शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदविण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पीकविमा क्षेत्राबाबत अनेक तक्रारी
दरम्यान बैठकीदरम्यान काही शेतकऱ्यांच्या पीक विमा नोंदींमध्ये प्रत्यक्ष क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र दाखविण्यात आले आहे, अशा तक्रारी आहेत. तसेच विविध कारणांमुळे काही शेतकऱ्यांचे विमा अर्ज रद्द झाल्याची प्रकरणेही उघडकीस आले आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करावे वास्तविक प्रकरण काय आहे ते जाणून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या. कोणत्याही पात्र शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे सांगण्यात आले. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नाही, त्यांनी तालुकास्तरीय विमा प्रतिनिधी, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानीची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मंत्री खडसे यांचे आवाहन
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैठकी दरम्यान विभागीय आयुक्तांशीही मंत्री खडसे यांनी चर्चा केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून अहवाल त्वरीत शासनाकडे सादर करून पीकविमा दाव्यांच्या निकाली प्रक्रियेला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हा प्रशासन, कृषी विभाग आणि विमा कंपनी यांच्यात प्रभावी समन्वय राखून शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळेल, यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश रक्षा खडसे यांनी दिले. नुकसानग्रस्त सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेळ न घालवता आपल्या शेती पिकाच्या नुकसानीची नोंद करावी, आवश्यक कागदपत्रे सादर करून स्थानिक कृषी खात्याच्या संपर्कात राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जेणे करून शासन पातळीवरून लवकरात लवकर मदत देता येईल.









