Nashik News: महाराष्ट्रातील रेशन दुकानदारांच्या दैनंदिन अडचणी तसेच प्रलंबित कमिशनचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे येथील ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर फेडरेशनतर्फे मंत्रालयामध्ये वित्त विभाग आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक नुकतीच झाली. त्यामध्ये धान्य पुरवठा आणि त्यासंबधीत येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली.
मंत्रालयात बुधवारी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर फेडरेशनची बैठक झाली. यावेळी बैठकीत वित्त सचिव विक्रमसिंह यादव यांनी सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना 10 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील सर्व दुकानदारांना तात्काळ कमिशन देण्याचे आदेश दिले. दरम्यान पुरवठा विभाग अप्पर मुख्य सचिव डॉ. संजीव कुमार यांनी आताच पुरवठा विभागाचा पदभार हाती घेतला आहे त्यांना संघटनेच्या प्रश्नांबाबत अवगत करण्यात आले. यावेळी डॉ. संजीव कुमार यांनी नवीन पदभार स्वीकारल्याने त्यांचा शॉप किपर्स संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील दुकानदारांनाच्या अडीअडचणी बाबत त्यांना निवेदन देण्यात आले. त्यावर त्यांनी अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले.

दुकानदारांच्या निवेदनात या मागण्यांचा समावेश
*ऑगस्ट ते ऑक्टोबर या 3 महिन्याच्या धान्य वाटपाबाबत महाराष्ट्र फेडरेशने 3 महिन्याचे धान्य देऊ नये, असे पत्र केंद्र सरकारला दिले होते व ते मान्य झाले असून सर्व दुकानदारांनी आलेल्या महिन्याचे धान्य वाटप करणे
*साखरेबाबत उपसचिव पाटील यांना 3 महिन्याची म्हणजे जुलै ते सप्टेंबर एकत्रित मशीनवर देणे व एकच पावतीमध्ये वितरण देण्यात यावे, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले व ते मान्य झाले असून सर्वांनी वितरणाचे काम करावे
*संघटना नेहमी दुकानदारांचे प्रश्न सोडविण्याचे काम शासन स्तरावर करत असून तरीही सर्वांनी संघटनेच्या कामाचा आदर करावा, असे आवाहन संघटनेने केले आहे.
यावेळी पुणे ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर फेडरेशनचे राज्य अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील, जनरल सेक्रेटरी बाबुराव म्हमाणे, नांदेड जिल्हाध्यक्ष अशोक एडके, सहसेक्रेटरी शाहूराजे गायकवाड, हरीश गुप्ता, उपाध्यक्ष निवृत्ती कापसे,संघटक प्रमुख दिलीप नवले, ठाण्याचे सेक्रेटरी विवेक बिहिरे, मुंबई अध्यक्ष नवीन मारू यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला.









