Amaravti News: जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सोमवारी पहाटे चार वाजता लागलेल्या आगीत उपचार घेत असलेल्या तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. काही बालकांना पुढील उपचारांसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांपैकी चार बालकांवर उपचार सुरू असून, एक गंभीर आहे. या अपघाताची दाखल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. अमरावतीमधील आजच्या दुर्घटनेमुळे मी खूप दुःखी झालो. माझे मन हेलावून गेले आहे. अशी भावना बावनकुळे यांनी व्यक्त केली असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
घटना अशी
दरम्यान पहाटे ४ वाजता आग लागताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. आगीचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही. एसएनसीयूमध्ये कमी दिवसांचे, कमी वजनाचे आणि गंभीर अवस्थेतील नवजात बालकांवर उपचार सुरू असतात. बावनकुळे म्हणाले, मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या घटनेचे तीव्र दुःख व्यक्त करतो. घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश मी दिले आहेत. जे जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय सहायता दिली जात असून, त्यांना लवकर आराम पडावा अशी सुविधा दिली जात आहे.

मृत बालकांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार उभे असून, सरकार व प्रशासन संपूर्ण मदत करत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात असून, आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली.
या दुर्घटनेमुळे मी खूप दुःखी झालो, माझे मन हेलावून गेले..
या अमरावतीमधील आजच्या दुर्घटनेमुळे मी खूप दुःखी झालो. माझे मन हेलावून गेले आहे. दगावलेल्या नवजात बालकांना अतिशय व्यथित अंतःकरणाने श्रद्धांजली व्यक्त करतो. त्यांच्या पालकांना हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर देवो, अशी प्रार्थना करतो. बावनकुळे यांनी एक्स सोशल माध्यमात अशी पोस्ट करून संवेदना व्यक्त केल्या आहे.









