Tiranga Rally Mumbai: नीट पेपर फुटी प्रकारणांनंतर जंतर- मंतरवर जे आंदोलन झाले, त्याचा परिणाम देशभर दिसत आहे. महाराष्ट्रात ही जेन-झी (Gen-Z) रस्त्यावर आहे. हे आंदोलन म्हणजे तरुणाईचा आणि विद्यार्थ्यांचा मोठा विजय असून तो जल्लोषात साजरा केला जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त नेतृत्त्वाखाली मुंबईत भव्य ‘तिरंगा रॅली’ काढण्यात आली. दादरच्या शिवाजी पार्क येथे विद्यार्थ्यांच्या लढ्याला मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी जल्लोष सभा घेतली. यावेळी हजारो युवक हातात तिरंगा घेऊन आले होते. रॅलीला मोठी गर्दी जमली.
राज ठाकरे काय म्हणाले?
यावेळी दादरमध्ये वीर सावरकर मार्गावर ठाकरे बंधूंनी जल्लोष सभा ठेवली.या सभेला मोठ्या प्रमाणात लोक दाखल झाले.मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही देशभर पेटवलेल्या आंदोलनाला यश आले, त्याचा उत्साह साजरा करायचा म्हणून सर्व इथे जमलो, या देशातील झेन-झी सरकारला आव्हान देऊ शकते हे आपल्याला या आंदोलनातून दिसले. मी इथे आज एक महत्वाची गोष्टी नमूद करतो. आज नीटच्या परीक्षा, पेपरफुटीचे झालेले सर्व आंदोलन आणि त्यानंतर देशभरात परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या, मी त्यांची आता नावे वाचून दाखवणार आहे. नावे वाचल्यावर राज ठाकरे यांनी सांगितले की, तुमच्या आंदोलनाला यश आले आणि हा उत्साह आपण सर्वजण साजरा करू पण आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक मिनिटे माैन धारण करून आणि शांत उभे राहू.
उद्धव ठाकरे यांची टीका
रॅलीत शिवसेना (यूबीटी) पक्षाचे प्रमुख उद्धव म्हणाले, “युवकांनी एका हुकूमशहाला आणि निरंकुशतेला हादरवून सोडले आहे. ही युवकांची ताकद आहे, हाच नवा भारत आहे. मंत्री प्रधान ते पंतप्रधान हा प्रवास आता खूपच छोटा झाला आहे. नितीन गडकरींनी लादलेल्या इथेनॉलमुळे आणि निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यांमुळे जनता संतप्त आहे. आता ही पिढी प्रश्न विचारेल.”

राजकीय पक्षांचा पाठींबा
दरम्यान या रॅलीला महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी देखील पाठींबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ठाकरेंच्या रॅलीला पाठिंबा दिलेला आहे. जंतर-मंतरवर शरद पवार यांनी अभिजित दिपके यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकले होते. आता मुंबईतील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी रॅलीमध्ये सहभागी होणार आहे.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्क परिसरात मोठी गर्दी जमल्याने मुंबई पोलिसांनी वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले. शिवसेना भवनाकडून शिवाजी पार्कच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेट्स लावण्यात आले असून, केवळ जल्लोषासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रवेश दिला जात आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस बल आणि होमगार्ड्सचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दी हळूहळू वाढत गेली.










