Latest Weather News: जळगाव जिल्ह्यात २४ ते २८ जुलै दरम्यान हलका आणि मध्यम पावसाचा अंदाज आहे. याठिकाणी अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. बुधवार आणि गुरुवारी काही काळ मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे जळगावकर पावसाकडे टक लावून बसला आहे. शेतीला देखील पुढील काळात पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, चार दिवस ग्रीन अलर्ट दिल्याने जोरदार पावसाने हुलकावणी दिली आहे. हलक्या सरी सोडल्या तर दमदार पाऊस २८ जुलै नंतरच बरसेल असे दिसते. दरम्यान पुण्याला आज शुक्रवारी रेड अलर्ट असून जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर नाशिक, नंदुरबार, धुळ्याला येलो अलर्ट आहे. या ठिकाणी अति मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज आहे.
गोदावरीला पूर कायम
नाशिकला आज येलो अलर्ट असून घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे. गोदावरीला पूर आला आहे. गोदातिरी असलेल्या भांडी बाजार आणि सराफ बाजार परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. रस्ते जलमय झाली. त्यामुळे गोदाकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. गुरुवारी विभागीय आयुक्त आणि नाशिकच्या महापौरांनी गोदावरीची पाहणी केली. त्यानंतर मात्र, उद्या पासून ग्रीन अलर्ट देण्यात आला असून हलका आणि मध्यम पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी नंदुरबार, धुळे, नाशिकला येलो अलर्ट आहे.
राज्यात काही ठिकाणी मुसळधार
दि. २४ ते २७ जुलै:दरम्यान राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. त्यामध्ये कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी; तसेच मराठवाड्यात अनेक ठिकाणी अत्यंत मुसळधार तर अति मुसळधार पावसाची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उद्या शनिवारी रायगड आणि पुणे घाटमाथा परिसराला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्याठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

मुंबई हवामान विभागाचा इशारा
दि.२४ जुलैला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता. कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर ताशी ४५-५५ किमी वेगाने (झोतासह ६५ किमी प्रति तास) सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
दि. २५ जुलैला कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी आणि लगतच्या भागात ताशी ४०-५० किमी वेगाने (झोतासह ६० किमी प्रति तास) सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
दि. २६ जुलैला कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता असून दि.२७ जुलै: कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता वर्तवली आहे.










