Nashik News: नवीन नाशिक (जुने सिडको) भागातील इमारतीतील व्यावसायिक गाळ्यांची घरपट्टी आकारणी करण्यासाठी साठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी विभागाचे सहाय्यक अधीक्षक मारुती डोंगरे (वय ५६) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. महापालिकेची कार्यपद्धती आधीच वादाच्या भोवऱ्यात असतांना लाच प्रकरणाने कारभारावर टीका केली जात आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांची जुने सिडको महापालिका हद्दीत निवासी, तसेच व्यावसायिक इमारत आहे. या इमारतीतील तीन गाळ्यांची घरपट्टी आकारणी करण्यासाठी २ जुलै रोजी मारुती डोंगरे यांनी जागेवर भेट देऊन पाहणी व मोजमाप केले होते. अनधिकृत बांधकामातील गाळ्यांची नियमित घरपट्टी आकारणी करून देण्यासाठी एकूण ८० हजार लाच मागितल्याचा आरोप आहे.

दरम्यान तक्रारदाराने वारंवार पाठपुरावा करूनही काम होत नसल्याने मंगळवारी लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची दखल घेत एसीबीने पडताळणी करून पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी ६ ऑगस्ट रोजी सापळा रचण्यात आला. तडजोडीनंतर ठरलेली ६० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना नवीन नाशिक मनपाच्या सहाय्यक अधीक्षक मारुती भीमा डोंगरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक खांडवी, हवालदार संदीप वनवे, योगेश साळवे, समीर शेख आदींच्या पथकाने कारवाई केली.








