Jalgaon News: जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना विदर्भाच्या धतवर डी प्लस दर्जा देण्यास मान्यता मिळाली असून, त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित होणे बाकी आहे. या अनुकूल वातावरणाचा लाभ घेऊन जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील उद्योजकांनी जळगावमध्ये नवीन उद्योग उभारावेत. डी प्लस दर्जाची मागणी उद्योगमंत्र्यांकडे केली आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीत जीआर निघणार नाही,तोपर्यंत जळगाव जिल्ह्यात पाय ठेवणार नाही. तसेच उद्योग उभारणीसाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य करणार असून गुंतवणूक परिषदेत 4,716 रोजगारनिर्मितीची क्षमता आहे. 102 उद्योगांसाठी 1,445.68 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
जिल्ह्यात गुंतवणूक आकर्षित करणे, नवीन उद्योगांना चालना देणे आणि रोजगारनिर्मिती वाढविण्याच्या उद्देशाने उद्योग आयुक्तालय व जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2026 चे आयोजन हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज, एमआयडीसी, जळगाव येथे करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते झाले.
यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, उद्योग विभागाच्या सहआयुक्त वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे उपायुक्त संतोष गवळी, शेंदुण नगर परिषदेचे नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल, माजी आ.गुरुमुख जगवाणी यांच्यासह उद्योजक, उद्योग विभागाचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

औद्योगिक भूखंडांवर नवीन उद्योग उभारावा
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना डी प्लस दर्जा देण्यास मान्यता मिळाली आहे. आता त्यासंदर्भातील शासन निर्णय लवकर निर्गमित होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव एमआयडीसीमध्ये 123, जामनेरमध्ये 573 आणि भुसावळमध्ये 304 असे एकूण एक हजार औद्योगिक भूखंड उपलब्ध आहेत. या भूखंडांवर नवीन उद्योग उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे. उद्योजकांना आवश्यक परवानग्या व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उभारण्यात येत असलेल्या उद्योग भवनाचे 80 ते 85 टक्के काम पूर्ण झाले असून ते लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
डी प्लस शासन निर्णयासाठी उद्योगमंत्र्यांना विनंती
तसेच डी प्लसच्या शासन निर्णयासाठी परिषदेतूनच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.यावेळी त्यांनी शासन निर्णय तातडीने निर्गमित करण्याची विनंती केली. त्यावर येत्या मंगळवारी यासंदर्भात बैठक घेऊन शासन निर्णय निर्गमित करण्याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सामंत यांनी दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
परिषदेत 1,400 कोटींची गुंतवणूक: एडीसी हारकर
अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर म्हणाले की, यंदाच्या परिषदेत 1,400 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून त्यातून सुमारे पाच हजार रोजगारांच्या संधी निर्माण होण्याची क्षमता आहे. उद्योगवाढीसाठी शासनाकडून विविध सवलती व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा. जिल्ह्यात कृषी पर्यटनालाही मोठी संधी असून उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी रोजगाराभिमुख नवीन तांत्रिक ट्रेड सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण उद्योग- महिला बचतगटांना प्रोत्साहन: सीईओ नायर
जिल्हा परिषदेच्या सीईओ करिष्मा नायर ग्रामीण उद्योग व महिला बचतगटांना प्रोत्साहन देत लखपती दीदी उपक्रमांतर्गत त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठेशी जोडण्यावर भर दिला जाईल. ग्रामीण उद्योगांसाठी वीज, रस्ते आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले.
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न: ना.सावकारे
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले की, जळगाव जिल्ह्याचा औद्योगिक विकास आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नवीन गुंतवणूक आवश्यक आहे. जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यास तरुणांना पुणे, मुंबई, नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर येथे रोजगारासाठी स्थलांतर करण्याची गरज कमी होईल. टेक्निकल टेक्स्टाईल क्षेत्रात जळगाव जिल्ह्याला मोठी संधी असल्याचे सांगून मंत्री सावकारे म्हणाले की, वैद्यकीय, कृषी आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक विविध वस्तूंचे उत्पादन जिल्ह्यात होऊ शकते. या क्षेत्रासाठी शासनाच्या विविध सवलती व अनुदानांचा उद्योजकांनी लाभ घ्यावा. जिल्ह्यातील उद्योजकांनी नवीन उद्योग जिल्ह्याबाहेर न उभारता जळगावलाच गुंतवणुकीसाठी प्राधान्य द्यावे. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
तापी-गिरणा नदीचा जलस्रोत उद्योगवाढीसाठी पूरक: आ भोळे
आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, बाहेरील गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच जिल्ह्यातील छोटे व्यापारी आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांसाठी जळगावमध्येच रोजगार उपलब्ध होतील. जिल्ह्यातील महामार्ग, विमानतळ, भुसावळ रेल्वे जंक्शन तसेच तापी आणि गिरणा नद्यांमुळे उपलब्ध होणारे जलस्रोत उद्योगवाढीसाठी पूरक ठरू शकतात. डी प्लस दर्जासंदर्भातील शासन निर्णयही लवकर निर्गमित व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
102 सामंजस्य करार; 1,445.68 कोटींची गुंतवणूक
या परिषदेत उद्योग विभागासोबत 102 उद्योजकांनी सामंजस्य करार केले. या करारांमधून 1,445.68 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक होणार असून, 4,716 रोजगारनिर्मितीची क्षमता आहे. जळगाव जिल्ह्यात उद्योग उभारण्याची तयारी दर्शविणाऱ्या उद्योजकांना सामंजस्य करारांचे वितरण करण्यात आले. एमओयू केलेल्या उद्योजकांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मागील गुंतवणूक परिषदांमध्ये झालेल्या सामंजस्य करारांपैकी सुमारे 80 टक्के उद्दिष्टपूत झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रास्ताविक उद्योग विभागाच्या सहआयुक्त वृषाली सोने यांनी केले. सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले. या परिषदेला जिल्ह्यातील तसेच जळगाव शहरातील उद्योजक, व्यापारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते











