होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या स्मशानभूमीची दुरावस्था; नगरपरिषदेचे दुर्लक्ष!

On: August 14, 2026 6:56 PM
Follow Us:
---Advertisement---

Varangaon News: जिल्ह्यात नावाजलेल्या वरणगाव शहरातील स्मशानभूमीची सध्या अस्वच्छता आणि विविध असुविधांमुळे दयनीय अवस्था झाली असून, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या स्मशानभूमीला देखभाली अभावी असुविधांचे ग्रहण लागले आहे. अंत्यसंस्कार व दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्याचा तुटवडा, अस्वच्छ प्रसाधनगृह आणि परिसरातील घाणीचा सामना करावा लागत आहे. नगरपरिषद प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या समस्यांचा निपटारा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वरणगाव शहराची लोकसंख्या वाढत असताना पूर्वी भोगावती नदीकिनारी ग्रामपंचायतीच्या काळात पत्र्याच्या शेडमध्ये असलेली छोटी स्मशानभूमी अपुरी पडत होती. परिसरातील अस्वच्छतेमुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को-ऑप. सोसायटीने पुढाकार घेतला. शासनाची परवानगी मिळाल्यानंतर सन २००६-०७ मध्ये सुमारे एक एकर जागेवर तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून सुसज्ज स्मशानभूमी उभारण्यात आली.

या स्मशानभूमीत एकाच वेळी चार मृतांवर अंत्यसंस्कार करता येतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. दोन मोठे सिमेंट काँक्रीटचे ओटे, त्यावर स्लॅब, नागरिकांसाठी स्टेडियमसदृश बैठक व्यवस्था, २४ तास पाणी व वीज, मोफत लाकूड, ध्वनीक्षेपकाद्वारे मंत्रोपचाराची सुविधा, दशक्रिया विधी हॉल, बगीचा, कुस्तीचा आखाडा, प्रवेशद्वाराजवळ हनुमान मंदिर तसेच रंगीबेरंगी फुलझाडांची लागवड करण्यात आली होती.

अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य

सोसायटी डबघाईस आल्यानंतर स्मशानभूमीच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले. त्यात नगरपरिषदेचेही अपेक्षित लक्ष नसल्याने सध्या परिसरात पावसाळी गवत वाढले असून उद्यानाची दुरवस्था झाली आहे. प्रसाधनगृहाची स्वच्छता होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. स्मशानभूमीच्या देखभालीसाठी सुरुवातीपासून नियुक्त असलेले सुकलाल भोई आर्थिक अडचणी असतानाही सेवा बजावत आहेत. मात्र, त्यांना प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.

एकाच वेळी १२ मृतांवर अंत्यसंस्कार

सुमारे दीड वर्षापूर्वी नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बस दरीत कोसळून २५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात वरणगावातील १२ भाविकांचा समावेश होता. भर पावसात या १२ मृतांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यावेळी या सुसज्ज स्मशानभूमीमुळे शहरवासीयांची मोठी गैरसोय टळली होती. त्यामुळे अशा महत्त्वाच्या सार्वजनिक सुविधेची तातडीने देखभाल व दुरुस्ती करण्याची गरज आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment