होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये: कुंभमेळा कामात दिरंगाई खपवून घेणार नाही: देवेंद्र फडणवीस

On: August 8, 2026 2:26 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik Kumbha Mela: नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित असून, सर्व विभागांनी विकास आरखड्यातील कामे नियोजित वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावीत. कामे पुढे ढकलण्याची वृत्ती दूर करुन कुंभमेळ्याच्या ३४ हजार ७३२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातील कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे आत मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये आले असून एक महिन्यानंतर पुन्हा आढावा घेणार आहेत.

सह्याद्री अतिथीगृह येथे नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, सरोज अहिरे, हिरामण खोसकर, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

१ महिन्यानंतर पुन्हा बैठक

मुख्यमंत्री म्हणाले की, सध्याची कुंभमेळ्यातील कामांची परिस्थिती समाधानकारक नसून प्रत्येक विभागाने अधिक वेगाने आणि समन्वयाने काम करण्याची गरज आहे. बैठकीत देण्यात आलेल्या सर्व सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी. एक महिन्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेण्यात येईल. त्या बैठकीपर्यंत कामामध्ये गुणात्मक आणि प्रत्यक्ष प्रगती दिसली पाहिजे. त्यामुळे पुढील बैठकीची तयारी आजपासूनच सुरू करावी.

विविध विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक

मुख्यमंत्री म्हणाले की, विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे. विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे कोणतेही काम रखडता कामा नये. सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करून कुंभमेळ्याची तयारी वेळेत पूर्ण करावी. नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी नाशिकमधील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची आणि रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी गती देण्याचे निर्देश दिले. निर्धारित वेळेत कामे न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी. विकास कामांचा नागरिकांना त्रास होऊ नये, याची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी.

महानगर गॅस कंपनीने गॅस जोडणीच्या कामांसाठी नाशिक महानगरपालिकेशी समन्वय साधून प्रलंबित गॅस कनेक्शनची कामे तातडीने पूर्ण करावीत. सिंहस्थ कुंभमेळा हा राज्याच्या प्रतिष्ठेचा विषय असून, सर्व विभागांनी वेळबद्ध नियोजन, परस्पर समन्वय आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे तसेच कुंभमेळ्याची तयारी वेळेत पूर्ण होईल यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

१२ कोटी भाविकांसाठी नियोजन

बैठकीत १२ कोटी भाविकांच्या सुरक्षित व सुलभ दर्शनासाठी वाहतूक, निवास, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन आणि डिजिटल सुविधा याबाबत सविस्तर नियोजन सादर करण्यात आले, त्याबाबत ते म्हणाले, नाशिक रिंग रोड, साधुग्राम उभारणी, रेल्वे स्थानकांचा विकास, ४,५०० विशेष एसटी बसेस तसेच विस्तृत पार्किंग व्यवस्थेची कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘डिजिटल कुंभ’ संकल्पनेअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, ‘कुंभदूत’ एआय सहाय्यक, डिजिटल ट्विन, स्मार्ट पार्किंग, हरवलेल्या व्यक्तींचा शोध, तसेच एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून गर्दी आणि सुरक्षा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचे निर्देश दिले.

प्लास्टिक मुक्त कुंभमेळा

कुंभमेळा स्वच्छ, हरित आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी हजारो तात्पुरती शौचालये, कचराकुंड्या, बदल खोल्या आणि मोठ्या प्रमाणात स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष पथके, स्वयंसेवक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही करण्यात येणार आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत असून हजारो युवकांना पर्यटन, आदरातिथ्य, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच सूक्ष्म उद्योजकांना व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

साधुग्राम-इतर नागरी सुविधा मार्चपर्यंत पूर्ण करा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी भूसंपादन, रिंग रोड, साधुग्राम आणि इतर महत्वाच्या नागरी सुविधा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करून एप्रिल २०२७ मध्ये प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. केंद्र व राज्य शासन, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाने समन्वयाने काम करून सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित, भव्य आणि भाविकांसाठी संस्मरणीय करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

बैठकीला नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिकचे सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यासह नाशिकचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment