Nashik News: श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे अत्यंत महत्वाचे ज्योर्तिलिंग असल्यामुळे येथे श्रावण मासाच्या कालावधीत भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. निरनिराळ्या माध्यमातून मंदिरात होणाऱ्या गर्दीमुळे, प्रशासनावर ताण निर्माण होतो, त्यामुळे ट्रस्ट व्यवस्थेला येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर विश्वस्त मंडळाने श्रावण मासाच्या अनुषंगाने अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी सर्व प्रकारचे व्हिआयपी दर्शन व्यवस्था दि. १३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत बंद करण्यात आले आहे, अशी माहिती त्र्यंबकेश्वर विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे.
दरम्यान श्रावणमासात श्री त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते. भाविकांची गर्दी झाली की, भाविकांना दर्शनासाठी वेळ देण्याची आवश्यकता असते. त्याकाळात येणाऱ्या व्हीआयपीमुळे विश्वस्त व्यवस्थापनावर ताण पडतो तसेच सर्वसामान्य भाविकांना दर्शनामध्ये अडथळा येऊ नये, दर्शनासाठी भाविकांना प्राधान्य देण्याची गरज असते.

शासकीय विभागाकडून येणाऱ्या अति महत्वाच्या व्यक्तींच्या संख्येमध्ये देखील विभागवार मर्यादा निश्चित केली असून त्यानुसार दैनंदिनरित्या फक्त सकाळी ०६.०० ते सकाळी १०.०० व सायं. ०६.०० ते रात्री ०८.०० या निश्चित वेळेतच फक्त २० अति महत्वाच्या व्यक्तींची दर्शन व्यवस्था श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.
तरी मंदिर प्रशासनावर गर्दीमुळे होणारा ताण तसेच निर्माण होणाऱ्या अडचणी विचारात घेता आपण श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे, ही विनंती. त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून अन्य सर्व सरकारी, निम सरकारी किंवा अन्य विभागाला आम्ही असे कळवित आहोत. असे त्र्यंबकेश्वर विश्वस्त मंडळाचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी आवाहन केले आहे.










