Latest Weather News: अल निनोचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. राज्यात पावसाने गेल्या दीड दोन महिन्यात काही भाग सोडला तर, उघडीप दिली आहे. पाऊस गायब झाल्याने पिकांवर संकट आले आहे. सोयाबीन पिकासह इतर पिकांना फटका बसला असून पीक करपण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. ३० ऑगस्ट तसेच ३ व ४ सप्टेंबर रोजी विदर्भात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे चिन्हे नाहीत. काही ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस पडेल. मात्र, जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात तापमान १ ते २ अंश सेल्सियस वाढण्याचा अंदाज आहे.
राज्यात सार्वधिक तापमान अकोल्यात
राज्यात पावसाने उघडीप दिल्याने काही जिल्ह्यात उकाडा जाणवत आहे. राज्यात सर्वाधिक तापमान ३३.९ अकोला येथे नोंदवलं गेलं आहे. त्यांनतर सोलापूरला कमाल तापमान ३३.३ अंश सेल्सियस तर, त्याखालोखाल जळगावचे तापमान ३२.५ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेलं आहे. जळगावमधून पाऊस बेपत्ता झाला आहे. त्यामुळे येथे ही दुपारी उकाडा जाणवतो. पुढील ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्रात कमाल तापमानात १-२ अंश सेल्सियसने हळूहळू वाढ होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

येथे जोरदार वारे वाहणार
कोकणातील अलीबाग (रायगड) मध्ये ५४ किमी ताशी, कुलाबा (मुंबई) ३६ किमी ताशी व सांताक्रूझ येथे (मुंबई) ३५ किमी प्रतितास. तर, मध्य महाराष्ट्रातील महाबळेæवर (सातारा) येथे ५० किमी ताशी, बारामती (पुणे) ५० किमी ताशी, विल्होळी नाशिक ४४ किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहे. मराठवाड्यात बदनापूर (जालना) येथे ४१ किमी ताशी ते ५९ किमी ताशी, वैजनाथ (बीड) ३९ किमी ताशी वेगाने वारे वाहणार आहे.








