Varangaon News: वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वझरखेडे गावातील एका युवकाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती पोलीसांना मिळताच पोलीसांनी सापळा रचून युवकाला ताब्यात घेतले असता, त्याचेकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस आढळून आल्याने वरणगाव पोलीसांनी त्याला अटक केली आहे .
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरणगाव नजिकच्या वझरखेडे गावात दिवगंत माजी सरपंच विकास पाटील यांच्या मुलाकडे गावठी कट्टा व जिवंत काडतुस तो गावात दहशत निर्माण करीत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती . त्यानुसार पोलीसांनी गुरुवारी सकाळच्या सुमारास गावात गुरुवारी सकाळच्या सुमारास सापळा रचून रोशन विकास पाटील ( वय – २६, रा वझरखेडे ) याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस आढळून आले.
या प्रकरणी पोलीसांनी त्याला अटक केली असून या युवकाने गावठी कट्टा व काडतुस कशासाठी व कुणाकडून आणले याबाबत पोलीस सखोल तपास करीत आहेत. तर एका छोट्याशा गावात २६ वर्षीय युवकाकडे गावठी कट्टा व काडतुस सापडल्याने वझरखेडे गावासह परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, सुधाकर शिंदे, प्रशांत ठाकुर, मनोज म्हस्के, ईश्वर तायडे, फिरोज पठाण व भूषण माळी तपास करीत आहेत.

तर अटक करण्यात आलेल्या युवकाकडे काही प्रमाणात धारदार शस्त्रेही असून पोलीसांनी या युवकाची चौकशी केल्यास काही शस्त्रे व त्याच्या सोबतचे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे मित्र जाळ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच हा युवक व त्याच्या एका मित्राने चार वर्षापूर्वी गावातीलच एका गरीब कुटुंबातील असह्य महिलेवर शेतात अत्याचार करून मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रण सुद्धा केले होते. हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले होते. मात्र, त्याच्या दहशतीमुळे या महिलेने तक्रार देण्यास नकार दिला होता. तसेच पोलीसांनी अटक केलेला युवक हा ग्रामपंचायतमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करीत असून त्याने ग्रामपंचायतीचा लॅपटॉप ही चोरून नेला होता. मात्र, या प्रकरणाला काही मध्यस्थी लोकांमुळे विराम देण्यात आला होता तसेच सद्यस्थितीतही तो ग्रामपंचायतमध्ये काम करीत असल्याची चर्चा गावात रंगू लागली आहे.








