Nashik News: राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते व अधिकारी कृती समितीने नाशिकरोड येथील महावितरणच्या परिमंडळ कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी व्दारसभा घेण्यात घेतली. महाराष्ट्रातील वीज उद्योगातील १७ कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समिती आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येने वीज कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी सहभागी झाले. तीनही वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर अद्याप समाधानकारक निर्णय न झाल्याच्या निषेधार्थ झालेल्या या सभेत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सभेला किरण जाधव, दीपक गांगुर्डे, सचिन पवार, हर्षद काटे, सुरेश पाचंगे आणि राजू पठाण यांनी मार्गदर्शन केले. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर त्वरित सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. महेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. सतीश पाटील यांनी आभार मानले.

आंदोलनात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्रवीज कामगार महासंघ, सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन, राज्य वीज कामगार काँग्रेस, राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन, तांत्रिक कामगार युनियन, राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन (इंटक), ग्रॅज्युएट इंजिनियर्स असोसिएशन, राष्ट्रवादी वीज कामगार काँग्रेस, राज्य विद्युत ऑपरेटर संघटना, वीज निर्मिती कामगार संघटना, फायनान्स अँड अकाऊंट एम्प्लॉईज युनियन, क्रांतिकारी लाईनस्टाफ सेना, राज्य वीज मंडळ कार्यालयीन कर्मचारी-अधिकारी संघटना आणि युनियन ऑफ केमिस्टसह विविध संघटनांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.








