Amalner News: तालुक्यात गुरुवारी(दि. २७ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं संपूर्ण तालुका हादरला आहे. टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील चौघांचा रेल्वेखाली दुर्दैवी अंत झाला, पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
दोन चिमुकल्यांचा समावेश
तालुक्यातील टाकरखेडा येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांचा रेल्वेखाली मृत्यू झाला. या घटनेत चौघांचाही दुर्दैवी अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुनील भिल, पत्नी पार्वती आणि मुले सनी व राज हे पहाटे सुमारे चार वाजता घरातून बाहेर पडले. त्यानंतर रेल्वे रुळावर ही दुर्घटना घडली. पहाटे सुमारे ४.४० वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. मृतांमध्ये दांपत्यासह दुसरी इयत्तेत शिकणारा सनी आणि अंगणवाडीत जाणारा चिमुकला राज यांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने टाकरखेडा गाव सुन्न झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
घटना कौटुंबिक कारणास्तव घडल्याची चर्चा
भिल कुटुंबाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक कारणातून ही घटना घडली असावी, अशी चर्चा असली तरी पोलिसांकडून याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.








