Mumbai News: आपल्या मुलांच्या आकांक्षा आणि त्यांची स्वप्ने बदलत आहेत. त्यानुसार आपल्या शाळाही बदलल्या पाहिजेत असे सांगून राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण आणि शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष, दृश्यमान आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश एकनाथ शिंदेंनी दिले. तसेच आमदार-खासदारांनी शाळा दस्तक घ्यावी अन् कॉर्पोरेट क्षेत्राचे सहकार्य घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चार तास बैठक झाली. राज्यातील शिक्षण क्षेत्राचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी विभागाच्या विविध उपक्रमांची आणि आतापर्यंत झालेल्या प्रगतीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिंदे यांना दिली. शिक्षण मंत्रालयाकडून सुरू असलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करताना त्यांनी शिक्षण विभागाने आता मिशन मोडवर काम करून हे चांगले काम राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत आणि विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावे, अशा सूचना दिल्या..
उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन
दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी तयार करणारी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी शिक्षणव्यवस्था आपण निर्माण करायला हवी. कृती आराखड्यात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांना सोबत घेणे, शिक्षकांसाठी प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रेरणादायी उपक्रम राबवणे तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन आणि योग्य सन्मान देणे, यावर भर देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक विकास हा शिक्षणव्यवस्थेचा केंद्रबिंदू असला पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले. त्यासाठी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, पोषण, मध्यान्ह भोजन योजनेचा आढावा तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य आणि भावनिक स्वास्थ्यासाठी आवश्यक उपक्रम यांना अधिक महत्त्व देण्याच्या सूचना दिल्या. तसेच शाळांच्या विकासात पालक, माजी विद्यार्थी आणि स्थानिक समाजाची सक्रिय भागीदारी वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
आमदार-खासदारांना शाळा दत्तक घेण्याचे आवाहन
आपल्या मतदारसंघातील शाळांच्या विकासासाठी आमदार आणि खासदारांनी शाळा दत्तक घेऊन उपलब्ध निधी आणि स्थानिक संसाधनांच्या माध्यमातून योगदान द्यावे, असे आवाहन ना.शिंदे यांनी केले. करण्यात येणार आहे.

कॉर्पोरेट क्षेत्राचे सहकार्य घेणार
दरम्यान राज्यातील शाळांच्या आधुनिकीकरणासाठी उद्योग आणि कॉर्पोरेट क्षेत्राची व्यावसायिक मदत घेण्याचा निर्णय झाला. येत्या काळात कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी आणि उद्योगक्षेत्रातील प्रमुखांशी बैठका घेऊन तंत्रज्ञान, प्रशिक्षण, कौशल्य, संसाधने आणि इतर आवश्यक सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.










