Jalgaon News: जळगाव तालुक्यातील नंदगाव येथे भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष मतदार पुनरीक्षण (एसआयआर) अभियानांतर्गत मतदान यादी अद्ययावत करण्याचे काम केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मुकेश पाटील यांनी कमी वेळेत यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा नानाश्री फाऊंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.

लोकशाहीची खरी ताकद ही अचूक व पारदर्शक मतदार यादीत असते. मतदार पुर्नरीक्षणाचे काम हे अत्यंत जबाबदारीचे असून त्यासाठी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून नोंदणी, दुरुस्ती, वगळणी व इतर प्रक्रिया काटेकोरपणे पूर्ण कराव्या लागतात. अशा महत्त्वपूर्ण मोहिमेत एन्युमरेशन फॉर्मचे १०० टक्के डिजिटायझेशन वेळेचे योग्य नियोजन करत जलद गतीने आणि यशस्वीरीत्या पूर्ण करून बीएलओ मुकेश पाटील यांनी उत्कृष्ट कामचे उदाहरण स्थापित केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा सन्मान म्हणून नानाश्री फाऊंडेशनने त्यांचा प्रेरणादायी पुस्तक, शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनव गौरव केला.
यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष स्वप्निल सोनवणे यांनी सांगितले की, समाजासाठी निःस्वार्थपणे व प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. याच भावनेतून केवळ पारंपरिक सत्कार न करता प्रेरणादायी पुस्तक भेट देण्याचा निर्णय आम्ही घेतला. प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका रागिणी सोनवणे, शिक्षिका कामिनी चव्हाण, आक्काबाई पाटील, मिनाक्षी पाटील, नानाश्री फाऊंडेशनचे स्वप्निल सोनवणे, मयुर सोनवणे, राकेश धनगर, आनंदा सोनवणे, विजय कोळी, भावेश सोनवणे, आबा कोळी, दुर्गेश सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते.










