Jalgaon News: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने कंबर कसली आहे. गणेशोत्सव मिरवणूक मार्गांवरील खड्डे तात्काळ बुजवून रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत करावेत, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्तांनी मक्तेदारांच्या झालेल्या बैठकीत दिले आहेत. या कामात दिरंगाई किंवा निष्काळजीपणा झाल्यास संबंधित मक्तेदाराचा मक्ता थेट रद्द करण्यात येईल, असा इशारा देखील आयुक्तांनी बैठकीत दिला.
महानगरपालिकेत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत आयुक्त बोलत होते. या बैठकीला शहरातील 7 प्रमुख कंत्राटदार तसेच मनपाच्या संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुरूम-माती ऐवजी सिमेंट काँक्रीटकरणाचा वापर करा
दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी मुरूम किंवा मातीचा वापर केला जातो, ज्यामुळे पहिल्याच पावसात पुन्हा खड्डे उघडे पडतात. ही बाब लक्षात घेऊन आयुक्तांनी या बैठकीत कठोर भूमिका घेतली. गणेशोत्सव मिरवणूक मार्ग आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवर तात्पुरती मलमपट्टी म्हणून मुरूम किंवा माती टाकणे पूर्णपणे बंद करावे. सर्व खड्डे सिमेंट काँक्रीटकरण करूनच पक्क्या स्वरूपात बुजवण्यात यावेत, असे सक्त आदेश आयुक्तांनी कंत्राटदारांना दिले.
गणेशोत्सवात श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुकांदरम्यान नागरिकांना किंवा गणेश भक्तांना रस्त्यांमुळे कोणताही त्रास होता कामा नये. जर कोणत्याही कंत्राटदाराने कामात दिरंगाई केली किंवा दर्जाहीन काम केले, तर त्याच्यावर कडक कारवाई करत त्याचा मक्ता रद्द करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या बैठकीनंतर मनपाच्या नगररचना व बांधकाम विभागाचे अधिकारी सतर्क झाले असून, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कामांची पाहणी आणि देखरेख करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरातील रस्ते खड्डेमुक्त होणार का, याकडे जळगावकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.









