Jalgaon News: जळगाव-ममुराबाद रस्त्यावरील व्हाळसादेवी मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना घडली. कावड यात्रेत सहभागी झालेल्या १० वर्षीय प्रबल राजू गवळी या चिमुड्याचा आयशर वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर परिसरात संतप्त जमावाने गाडी पेटविल्याने काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.
नेमकी काय घडली घटना?
शनिपेठ परिसरातील गवळीवाड्यातून निघालेली कावड यात्रा व्हाळसादेवी मंदिराकडे आली होती. यात्रा आटोपून भाविक परत जात असताना, जळगावकडून चोपड्याकडे ओम शांती ट्रान्सपोर्ट ची किराणा माल घेऊन जाणाऱ्या (MH-20-EG-3593) क्रमांकाच्या आयशर वाहनाने प्रबल गवळी याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहनाने त्याला काही अंतरापर्यंत ओढत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या दुर्दैवी घटनेत प्रबलचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

नातेवाईकांचा आक्रोश अन् रस्ता रोको
घटनेची माहिती मिळताच प्रबलचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. एकुलता एक मुलगा गमावल्याने गवळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांचा आक्रोश काळजाला भिडणारा होता.अपघातानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी व नागरिकांनी रस्ता रोखून धरला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकाला तातडीने ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, तोपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली.
संतप्त जमावाकडून वाहनाला आग
परिसरातील परिस्थिती अधिक चिघळल्याने संतप्त जमावाने किराणा मालाने भरलेल्या संबंधित आयशर वाहनाला आग लावली. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.








