Jalgaon News: बँक कर्मचारी आपल्या प्रलंबित मागणीसाठी पुन्हा एकवटले असून पाच दिवसांचा आठवडा लागू करावा या मागणीसाठी शहराच्या विविध बँकांतील शेकडो कर्मचाऱ्यांनी बुधवारी एसबीआयच्या मुख्य शाखेच्या प्रवेशद्वारासमोर एकत्रित येत निदर्शने केली. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. बँक कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा बँकिंग संघटनांनी दिला आहे.
या बँकांचा समावेश
या आंदोलनात एसबीआय, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आदी बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. पाच दिवसांचा आठवडा लागू झाल्यास कामकाजात सुसूत्रता राखली जाईल, अशी कर्मचाऱ्यांची भूमिक आहे. कर्मचाऱ्यांनी नेशनवाइड डेमोट्रेशन, फाईव्ह डेज बँकिंग वी डिमांड अशा प्रकारचे पोस्टर हातात धरून घोषणाबाजी केली.
आंदोलनात विविध बँकांचे अधिकारी- कर्मचारी सहभागी
आंदोलनात ऑल इंडिया बँक ऑफ बडोदा ऑफिसर्स असोसिएशनचे सेन्ट्रल कमिटी मेंबर प्रशांत मेहता, ऑल इंडिया बँक ऑफ बडोदा ऑफिसर्स असोसिएशन जळगावचे रिजनल सेक्रेटरी निलेश शीपलकर, एसबीआयचे प्रसाद पाटील, विजय सपकाळे, पंजाब नॅशनल बँकेचे हेमंत शिंदे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे भरत जाधव, बँक ऑफ इंडियाचे किशोर इधाटे सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांना पुरेशी विश्रांती मिळाल्यास बँकिंग सेवेत कार्यक्षमता वाढेल, असे प्रतिपादन एसबीआयचे प्रसाद पाटील यांनी केले. बँक कर्मचाऱ्यांची प्रलंबित असलेली ही मागणी रास्त आहे. ही मागणी सरकारने त्वरित पूर्ण करावी, अशी अपेक्षा बीओबीचे प्रशांत मेहता यांनी व्यक्त केली. तर कर्मचाऱ्यांची ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. इतर क्षेत्रात पाच दिवसाचा आठवडा आहे. मग बँक कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा का नाही, असा प्रश्न बीओबीचे निलेश शीपलकर यांनी उपस्थित करत लक्ष वेधले.

देशभर निदर्शने
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) केलेल्या आवाहनानंतर, पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी बुधवारी देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांची ही प्रलंबित मागणी अनेक वर्षांपासून पूर्ण झालेली नाही आणि सरकारने कोणताही विलंब न करता तिची अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष करणे सुरूच ठेवल्यास अनिश्चित काळासाठी संप पुकारण्याचा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात विविध सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचे मोठ्या संख्येने कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते.









