Mumbai News: भिवंडी येथे घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज दि. ३१ जुलै रोजी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची भेट देऊन पाहणी केली. दरम्यान शासनाकडून या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंत्री महाजन यांनी जाहीर केली. तसेच या दुर्घटनेप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. मुंबईतील भिवंडी येथे गुरुवारी रात्री चार मजली इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी भेट दिल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा प्रशासनाकडून बचाव व मदतकार्याची सविस्तर माहिती घेतली. आपत्तीग्रस्तांना तातडीने सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित प्रशासनाला दिले. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्यांचे यावेळी महाजन यांनी माध्यमांना सांगितले. दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने सर्वोत्तम वैद्यकीय उपचार केले जातील, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भिवंडीतील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात शासन पाठीशी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केल्या. याप्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. यावेळी माजी मंत्री कपिल पाटील, स्थानिक खासदार सुरेश म्हात्रे, आमदार महेश चौगुले, महापौर नारायण चौधरी, जिल्हाधिकारी श्रीकांत पांचाळ यांच्यासह पालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत, तर आणखी दोन ते तीन जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, असे भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप यांनी सांगितले.
पंतप्रधानांकडून शोक संवेदना व्यक्त
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शोक व्यक्त केला आणि मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. मुंबईतील भिवंडीत येथे गुरुवारी रात्री चार मजली इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला.









