Pune News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉकरोच जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, सीजेपी ही केवळ छोटीशी संघटना नाही, सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्रॅम आहे. अशी विरोधकांवर टीका केली. या संघटनेत भारत जोडो मधील संघटना सहभागी असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. विरोधकांकडे आता मुद्दे नाहीत म्हणून ते आता हिंदू कसे चुकीचे आहे, हे सांगत बसतील असा टोला ही फडणवीस यांनी लगावला.
पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, विरोधकांची आपल्या विचारांना विरोध करण्याची क्षमता संपली असून आता काही मुद्द्यांवरून ते दंगा करतील, हिंदू समाज कसा चुकीचा आहे हे सांगत बसतील, हिंदू धर्माला बदनाम करणाऱ्यांचे पुढचे टार्गेट आता कुंभमेळा आहे, असे ही फडणवीस म्हणाले. डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा, असे सांगून सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची क्षमता फक्त पुण्यातच आहे. असे ते म्हणाले.

विरोधकांचे काम हिंदूंना बदनाम करणे
विरोधकांवर टीका करतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हिंदुत्वाला यांनी विरोध केला, राम मंदिराला विरोध केला. या विरोधामुळेच जनतेने यांना घरी बसवलं आहे. राम मंदिरातील दानपेटीतील काही प्रमाणात घोटाळा झाला हे सत्य आहे. मात्र सगळं मंदिरच लुटल्याचा आव विरोधकांनी आणणे म्हणजे तसा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करणे होय, आता यांचे पुढचे टार्गेट हे कुंभमेळा आहे, असे फडणवीस म्हणाले.विरोधकांचे पोपट कुंभमेळ्यात भ्रष्टाचार होत असल्याचं सांगत आहे. पण, कुंभमेळ्यात आतापर्यंत जेवढे टेंडर झाले आहेत, त्याचे चार टप्प्यांमध्ये ऑडिट होत आहे. खोटं बोला पण रेटून बोला असं विरोधकांचं सुरू आहे, असा टोमणा ही त्यांनी मारला.
राहुल गांधींवर केली टीका
खरे तर, “महिला आरक्षणाला विरोध करणारे कांग्रेस आणि त्यांचे घटकपक्ष होते. पहिले पाठिंबा दिला, आता विरोध का? महिला आरक्षणाचे खरे हत्यारे राहुल गांधी हेच असल्याचा आरोप त्यांनी केला. महिला आरक्षण कायद्याचा राहुल गांधींनी शिरच्छेद केला. राहुल गांधी रोज खोटं बोलतील. मात्र आपण सत्य घेऊन जनतेत गेले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.











