Jalgoan News: एमआयडीसी परिसरातील आर.एल. चौफुलीजवळ भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ४८ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप सुपडू अलकरी (वय ४८, रा. सद्गुरुनगर, अयोध्यानगर, जळगाव) हे दि. २६ जुलै रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजता त्यांच्या होंडा शाईन मोटारसायकल (क्र. एमएच-१९ डीडब्ल्यू-२४९९) ने आर.एल. चौफुलीकडून आर.जी. मेटल अँड कंपनीकडे जात होते. त्यावेळी बॉम्बे नागोरी को-ऑपरेटिव्ह सोसायटीसमोर मागून भरधाव वेगाने आलेल्या पिवळा डंपर (क्र. एमएच-३० एल-२१५२) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात संदीप अलकरी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळी न थांबता वाहनासह फरार झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना सांगितले.
याप्रकरणी मयताचे भाऊ किरण सुपडू अलकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात पिवळ्या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा, शवविच्छेदन आदी प्रक्रिया पूर्ण केल्या असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक मोहन काळे करीत आहेत.










