Jalgaon News: राज्याचे लक्ष आज कोथळी येथे लागून होते.या कार्यक्रमात खा. शरद पवार उपस्थित होते. खा. पवार म्हणाले, महाराष्ट्रात एकेकाळी भाजपचे राजकीय अस्तित्व मर्यादित होते. मात्र, पक्ष तळागाळात रुजविण्यासाठी ज्या लोकांनी सातत्याने मेहनत घेतली, त्यात प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांची यादी प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे.
भाजपच्या विस्तारात योगदान
एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त कोथळी (मुक्ताईनगर) येथे आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. खडसेंच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेताना पवार यांनी त्यांच्या विधिमंडळातील कामगिरीपासून महाराष्ट्रातील भाजपच्या विस्तारातील योगदानापर्यंत अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचे स्थान आजच्या तुलनेत पूर्वी मर्यादित होते. त्या काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी अनेक नेत्यांनी तळागाळात काम केले. प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पवार यांनी सांगितले. खडसे यांनी केवळ निवडणुका लढविण्यापुरते राजकारण न करता पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि ग्रामीण भागात भाजपची पाळंमुळं घट्ट करण्यासाठी काम केले. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या विस्ताराचा इतिहास लिहिताना खडसे यांचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही, असे ते म्हणाले
विधानभवनात खडसे यांचे भाषण आवर्जून ऐकायचो
खा. पवार पुढे म्हणाले की, १९६७ मध्ये पहिल्यांदा विधानसभेत निवडून आलो. त्यानंतर विधानसभेत जनतेच्या प्रश्नांवर तळमळीने आणि प्रभावीपणे बोलणाऱ्या सदस्यांकडे आपले विशेष लक्ष असायचे, असे पवार म्हणाले. त्यावेळी दोन सदस्यांची भाषणे आपण आवर्जून ऐकत होतो आणि त्यापैकी एक एकनाथ खडसे होते, असे त्यांनी नमूद केले. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न खडसे यांनी विधिमंडळात विरोधी बाकावर बसून सातत्याने आक्रमकपणे मांडले. प्रश्नांची मांडणी करताना त्यांची तळमळ आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे ते वेगळे ठरत होते, असे पवार यांनी सांगितले.
एकावेळी १२ खाती सांभाळणारा मंत्री
१२ खाती सांभाळणारे एकमेव मंत्री
महायुती सरकारमध्ये एकाचवेळी तब्बल १२ खात्यांची जबाबदारी सांभाळणारे खडसे हे एकमेव मंत्री होते, असे त्यांनी सांगितले. अनेक महत्त्वाची खाती एकाचवेळी सांभाळताना प्रशासनावर पकड ठेवणे आणि विविध विभागांशी संबंधित प्रश्न हाताळणे ही सोपी बाब नव्हती. मात्र, खडसे यांनी दीर्घकाळ राज्याच्या राजकारणात सक्रिय राहून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली, असे पवार यांनी नमूद केले. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये दीर्घकाळ काम केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जनतेचे प्रश्न सरकारकडे मांडण्यासाठी त्यांच्यासारख्या लोकांची गरज असल्याचे लक्षात ठेवून आम्ही त्यांना विधान परिषदेवर संधी दिली, असेही पवार म्हणाले.
भाजपची ताकद वाढविण्यामागे खडसे यांचे कष्ट: नितीन गडकरी
जळगाव जिल्ह्यात भाजपची जी ताकद दिसते, त्यामागे अनेक कार्यकर्त्यांचे कष्ट आहेत; मात्र त्या पिढीतील नेत्यांमध्ये एकनाथ खडसेंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एनसीपी(सपा) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आ. एकनाथ खडसे यांच्या राजकीय योगदानाविषयी गौरवोद्गार काढले. खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त गडकरी यांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीतील योगदान आणि भाजपच्या पक्ष संघटन उभारणीतील भूमिकेवर प्रकाश टाकला.
जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र-खान्देशात भाजपचा विस्तार होत असताना एकनाथ खडसे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे गडकरी यांनी सांगितले. पक्षाचा विचार समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविणे, कार्यकर्त्यांना संकटाच्या काळात धीर देणे, विरोधकांच्या टीकेला सामोरे जाणे आणि अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याची त्यांची जिद्द पक्षासाठी महत्त्वाची ठरली. त्यांनी उभारलेली कार्यकर्त्यांची फळी, जनसंपर्क आणि लोकांमध्ये निर्माण केलेला विश्वास याचा पक्षाला पुढील काळात मोठा फायदा झाल्याचे गडकरी म्हणाले. त्यांनी शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर संघर्ष केला.
पवारांची साथ का सुटली, रामदास आठवले यांनी सांगितले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले, तरी त्यांच्यातील व्यक्तिगत संबंध आजही कायम आहेत. मात्र शिर्डी मतदारसंघातील पराभवामुळे आपली राजकीय दिशा बदलली आणि शरद पवारांची साथ सुटली, अशी खंत आठवले यांनी जळगाव जिल्ह्यातील कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथे व्यक्त केली. शिर्डीत पराभव झाला नसता तर कदाचित आपण आजही शरद पवारांसोबतच राहिलो असतो, असेही आठवले यांनी सांगितले.
स्थानिक आमदार, मंत्र्यांची अनुपस्थिती
एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच रक्षा खडसे, खासदार भास्कर भगरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आदी उपस्थित होते. मात्र, जळगाव जिल्ह्यातील सर्व आमदारांसह जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात त्याची चर्चा रंगली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीचीही शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, तेही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.








