Uttarakhand News: देशभरातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक राज्यांमध्ये नद्यांना पूर आला आहे. डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले आहेत. अनेक भागांमध्ये अचानक पूर येण्याचा धोका वाढला असून, त्यामुळे लोकांची चिंता आणखी वाढली आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत असून, अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने २ ते ६ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
उत्तराखंडमध्ये जनजीवनविस्कळीत झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सलग पाऊस पडत आहे. मंगळवारी पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. नैनी सरोवरातील पाण्याची पातळी ८५ फुटांची पातळी ओलांडल्यानंतर पाण्याचा निचरा करण्यासाठी कालवे उघडण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यात १७२ रस्ते बंद आहेत. आज नैनिताल, बागेश्वर आणि डेहराडूनसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर पाच जिल्ह्यांमधील शाळा आणि अंगणवाडी केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत.

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी उत्तराखंडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. परिणामी, संवेदनशील भागांमध्ये भूस्खलन, चिखलाचे लोट, पाणी साचणे आणि रस्ते बंद होण्याचा धोका वाढू शकतो. मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे उत्तराखंडमधील अल्मोरा, बागेश्वर, टिहरी, नैनिताल, उधम सिंग नगर आणि पौरी येथे पावसाशी संबंधित घटनांबाबत प्रशासनाची चिंता वाढली आहे.









