Jalgaon News: महाराष्ट्र बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया सोबत सलग्न असलेली महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन तर्फे (एस.टी.ओ. स्टेट टेक्निकल ऑफिशियल) राज्य तांत्रिक अधिकारी पात्रता अभ्यासवर्ग व प्रमाणपत्र कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातून बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावचे जिल्हाध्यक्ष निलेश बाविस्कर यांची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मोट्या उत्साहाने या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. त्यात जळगावचे निलेश बाविस्कर हे उतीर्ण झाले असून, त्यांचे महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या.
दि. २५ आणि २६ जुलै दरम्यान आमदार निवास नागपूर येथे ही परीक्षा घेण्यात आली. बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे नॅशनल टेक्निकल ऑफिशियलचे प्रशिक्षक व मुल्याकनकर्ता मिलन वैद्य यांनी अभ्यासक्रम प्रभावीरीत्या घेतला. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना राज्यातील बॉक्सिंग खेळाचे सुयोग्य प्रशासन, तांत्रिक गुणवत्ता, स्पर्धांचे एकसमान नियोजन आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निकषांनुसार कार्यपद्धती विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेशी संलग्न असलेल्या सर्व जिल्हा बॉक्सिंग संघटनांच्या संवैधानिक पदाधिकाऱ्यांसाठी आंतरशालेय बॉक्सिंग स्पर्धा, आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा तसेच विविध जिल्हा, विभागीय व राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धांचे तांत्रिक संचालन, पर्यवेक्षण व व्यवस्थापन अधिक प्रभावी, पारदर्शक व नियमसुसंगत पद्धतीने करण्यासाठी या अभ्यासवर्गाची रचना करण्यात आली होती.

राज्यभरात तांत्रिक कार्यपद्धतीमध्ये एकरूपता निर्माण करणे, स्पर्धांचे गुणवत्तापूर्ण आयोजन सुनिश्चित करणे आणि प्रत्येक जिल्हा संघटनेमध्ये सक्षम तांत्रिक नेतृत्व विकसित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. त्यामुळे सर्व संलग्न जिल्हा संघटनांच्या संवैधानिक पदाधिकाऱ्यांनी या अभ्यासवर्गात सहभाग घेऊन आवश्यक पात्रता निकष पूर्ण करणे अत्यंत आवश्यक व अपेक्षित असते.
दरम्यान जळगावचे निलेश बाविस्कर उतीर्ण झाल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र बॉक्सिंगम असोसिएशनचे अध्यक्ष राहुल शेवाळे, उपाध्यक्ष रणजित सावरकर, महासचिव राकेश तिवारी, कोषाध्यक्ष मिलन वैद्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








