Nashik News: नाशिक शरासह नाशिक रोड भागात ही मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडले आहे. देवळालीगाव, विहितगाव, जयभवानी रोड तसेच सिन्नर फाटा ते दत्त मंदिरदरम्यानच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान खड्डेमुक्त नाशिक आणि विविध प्रश्नांसंदर्भात सोमवारी जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा ही पोस्टर लावून दिला आहे.
शिवसेना युवा सेनेचे अतुल धोंगडे, सागर कोकणे, आकाश उगले यांनी दत्त मंदिर चौकात निषेधाचे होर्डिंग लावून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले.
महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी केली. होर्डिंगवर ‘खड्डेमुक्त नाशिक हवे… आता तरी जागे व्हा…रस्त्यावर खड्डे… यमराजही हैराण…’ अशा मजकुरातून प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सावरकर उड्डाणपुलावर पूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण जेसीबीच्या साहाय्याने उकरण्यात आल्याने मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांचे टायर अडकत असून दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. अपघात झाल्यास दुचाकीस्वार उड्डाणपुलावरून खाली कोसळण्याची भीतीही आहे. मागील वर्षी याच उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. उड्डाणपुलावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून डांबरीकरण करावे, रिफ्लेक्टर बसवावेत तसेच दुभाजकाला रंगरंगोटी करून वाहनचालकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन करू असा इशारा युवा सेनेने दिला आहे.










