Nashik / Bhusaval News: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा दरम्यान भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे देवळाली, नाशिक रोड, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकाणे या पाच महत्त्वाच्या स्थानकांवर व्यापक प्रवासी पायाभूत सुविधा विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. प्रवासी हाताळणी क्षमता वाढविणे, गर्दी व्यवस्थापन अधिक सक्षम करणे आणि कुंभमेळ्यादरम्यान रेल्वे संचालन अधिक कार्यक्षम बनविणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
पूर्वी कुंभमेळ्यातील बहुतांश प्रवासी वाहतूक नाशिक रोड स्थानकावर केंद्रित होत असे. मात्र, यावेळी पाच स्थानकांवर आधारित बहु-स्थानक प्रवासी वर्गीकरण ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांची विविध स्थानकांवरून ये-जा सुलभ होईल, गर्दीचे समान व्यवस्थापन, सुरक्षिततेत वाढ होईल आणि विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन अधिक परिणामकारकपणे करता येईल.
नऊ नवीन पादचारी पूल
या सर्व स्थानकांवर नऊ नवीन पादचारी पूल, कायमस्वरूपी व तात्पुरती होल्डिंग एरिया, अतिरिक्त फलाट, विस्तारित प्लॅटफॉर्म कव्हर शेड, प्रशस्त सर्क्युलेटिंग एरिया, अधिक पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, स्वच्छतागृहे, तसेच दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश सुविधा विकसित करण्यात येत आहेत. यामुळे कुंभमेळ्यातील प्रचंड प्रवासी गर्दी सुरक्षितपणे हाताळण्यास रेल्वेला मोठी मदत होणार आहे.

देवळालीत नवे पूल, फलाट
दक्षिणेकडून नाशिककडे येणाऱ्या भाविकांसाठी देवळाली स्थानक महत्त्वाचे आगमन व निर्गमन केंद्र म्हणून विकसित केले जात आहे. येथे ६ मीटर रुंदीचे रॅम्पयुक्त दोन नवीन पादचारी पूल, मुंबईच्या दिशेला २४ डब्यांच्या रेल्वेसाठी नवीन उच्चस्तरीय फलाट, नाशिक रोडच्या दिशेने जाणा-या फलाटाचा विस्तार व आधुनिकीकरण, तसेच अतिरिक्त लूप लाईन्स उभारण्यात येत आहेत. सुमारे ९,४३५ चौ.मी. क्षेत्रफळाचे नवीन प्लॅटफॉर्म शेड उभारण्यात येणार आहेत.
कायमस्वरूपी व तात्पुरते होल्डिंग एरिया, विस्तारित सर्क्युलेटिंग एरिया, अतिरिक्त स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा तसेच पिट लाईन्स, सिक लाईन्स, स्टेबलिंग लाईन्स, शंटिंग नेक आणि आधुनिक रेल्वे परिचालन सुविधा विकसित करण्यात येत आहेत.
नाशिक रोडला फलाट विस्तार
नाशिक शहरासाठी मुख्य रेल्वे स्थानक असलेल्या नाशिक रोड येथे सर्वाधिक प्रवासी सुविधांचा विकास करण्यात येत आहे. येथे १२ मीटर रुंदीचा रॅम्पयुक्त पादचारी पूल उभारला जात असून, पूर्व बाजूस स्वतंत्र प्रवेश व निर्गमनद्वारे, सर्क्युलेटिंग एरिया, पार्किंग सुविधा आणि नवीन पादचारी पुलाशी जोडणी असलेला प्रवेशमार्ग विकसित केला जात आहे. फलाट क्रमांक एकचा विस्तार करून तो २४ डब्यांच्या रेल्वेसाठी सक्षम करण्यात येत आहे, तर फलाट क्रमांक ४ चे पुनर्बांधणीसह सुमारे ३,५०० चौ.मी. कव्हर शेड, अतिरिक्त पाण्याचे स्टँड आणि इतर सुविधा विकसित केल्या जात आहेत. कायमस्वरूपी व तात्पुरते होल्डिंग एरिया देखील उभारण्यात येत आहेत. याशिवाय विशेष कुंभमेळा नियंत्रण टॉवर व कंट्रोल सेंटर उभारण्यात येणार असून, त्याद्वारे प्रवासी हालचाल, गर्दी नियंत्रण आणि स्थानक संचालनाचे प्रभावी समन्वयन केले जाणार आहे.
ओढा – पर्यायी संचालन केंद्र
ओढा स्थानकाला नाशिक रोडवरील गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाचे पर्यायी स्थानक तसेच विशेष रेल्वेगाड्यांच्या स्टेबलिंगसाठी प्रमुख केंद्र म्हणून विकसित केले जात आहे. येथे अतिरिक्त आयलंड फलाट, ६ मीटर रुंदीचे दोन रॅम्पयुक्त पादचारी पूल, सुमारे ११,००९ चौ.मी. कव्हर शेड, नवीन लूप लाईन्स आणि विस्तारित स्टेबलिंग सुविधा विकसित केल्या जात आहेत.
सुमारे २,५०० प्रवाशांची क्षमता असलेले दोन कायमस्वरूपी जलरोधक होल्डिंग एरिया विकसित करण्यात येणार असून, त्यामध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, मूत्रालये आणि वॉश बेसिनची सुविधा असेल. याशिवाय सर्क्युलेशन सुविधा, परिचालन इमारती, पाणी साठवण व्यवस्था आणि संरक्षण भिंतींची उभारणी करण्यात येत आहे.
खेरवाडी – वाढीव प्रवासी क्षमता
खेरवाडी स्थानकाचा आधुनिक प्रवासी केंद्र म्हणून विकास करण्यात येत आहे. येथे २४ डब्यांच्या रेल्वेसाठी दोन नवीन उच्चस्तरीय फलाट, ६ मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल, सुमारे १५,७०० चौ.मी. कव्हर शेड, कायमस्वरूपी होल्डिंग एरिया आणि विस्तारित सर्क्युलेटिंग सुविधा उभारण्यात येत आहेत.
तसेच नवीन प्रवेशमार्ग, पादचारी मार्ग, संरक्षण भिंती, पाणी साठवण सुविधा आणि अतिरिक्त स्टेबलिंग लाईन्स विकसित केल्या जात आहेत. या कामांमुळे प्रवासी हाताळणी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून, सुरक्षित व सुव्यवस्थित प्रवासी हालचालीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होतील.
कसबे सुकणे-पर्यायी प्रवेशद्वार
कसबे सुकणे स्थानकाचा विकास उत्तरेकडून येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाच्या पर्यायी रेल्वे स्थानकाच्या स्वरूपात करण्यात येत आहे. येथे २४ डब्यांच्या रेल्वेसाठी सक्षम उच्चस्तरीय फलाट, ६ मीटर रुंदीचे दोन रॅम्पयुक्त पादचारी पूल, सुमारे १०,२०० चौ.मी. कव्हर शेड, कायमस्वरूपी होल्डिंग एरिया तसेच रेल्वे संचालनासाठी आवश्यक अतिरिक्त सुविधा विकसित करण्यात येत आहेत.
याशिवाय अतिरिक्त लूप लाईन्स, स्टेबलिंग लाईन्स, स्वच्छतागृहे, विस्तारित सर्क्युलेटिंग एरिया, स्थानक इमारतींचे आधुनिकीकरण, संरक्षण भिंती आणि पाणी साठवण सुविधा उभारण्यात येत आहेत. त्यामुळे नाशिक शहरात पोहोचण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणातील प्रवासी वाहतूक प्रभावीपणे वितरित करता येईल.
एकात्मिक प्रवासी व्यवस्थापन
या संपूर्ण परियोजनेत प्रवासी सुरक्षितता आणि कार्यक्षम संचालनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. रुंद व रॅम्पयुक्त पादचारी पुलांमुळे दिव्यांगांसह सर्व प्रवाशांना सुलभ हालचाल शक्य होईल. कायमस्वरूपी व तात्पुरत्या होल्डिंग एरियामधून फलाटांवरील गर्दी नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.
विस्तारित प्लॅटफॉर्म शेड, अतिरिक्त स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आणि सर्क्युलेटिंग एरिया यामुळे विशेषतः पावसाळ्यात होणाऱ्या प्रमुख शाही स्नानाच्या काळात भाविकांना अधिक सोयी उपलब्ध होतील. त्याचबरोबर नवीन लूप लाईन्स, स्टेबलिंग सुविधा, यार्ड रिमॉडेलिंग आणि आधुनिक परिचालन पायाभूत सुविधांमुळे कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या संख्येतील विशेष रेल्वेगाड्यांचे प्रभावी नियोजन आणि संचालन शक्य होणार आहे.
प्रवाशांसाठी सूचना
ही सर्व कामे सुरू असताना रेल्वे स्थानके नियमितपणे कार्यरत राहणार असल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे. विविध कामांच्या अनुषंगाने काही ठिकाणी तात्पुरते मार्गबदल, बॅरिकेडिंग किंवा प्रवेश व निर्गमन मार्गांमध्ये बदल करण्यात येऊ शकतात. प्रवाशांनी केवळ अधिकृत प्रवेशद्वार, निर्गमन मार्ग, पादचारी पूल आणि होल्डिंग एरिया यांचाच वापर करावा. रेल्वे रुळ ओलांडू नयेत तसेच अतिरिक्त प्रवासाचा वेळ गृहीत धरून प्रवासाचे नियोजन करावे.
कुंभमेळ्याच्या प्रारंभापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वेगाड्या, वेळापत्रक, फलाट क्रमांक आणि प्रवेश व्यवस्थेबाबतची माहिती अधिकृत माध्यमांतून प्रसिद्ध करण्यात येईल. प्रवाशांनी प्रवासापूर्वी ती माहिती अवश्य तपासावी असे आवाहन रेल्वेने केले आहे.










