होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

शहरातील अस्वच्छतेच्या प्रश्नावर स्थायी सभेत गदारोळ; बीव्हीजी कंपनीला काम सुधारण्यासाठी शेवटचा अल्टीमेटम

On: August 20, 2026 6:54 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी कचरा व्यवस्थापन, मुजोर अधिकारी आणि शहरात पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यावरून जोरदार गदारोळ झाला. कोट्यवधी रुपये उकळूनही जळगाव शहराची स्वच्छता राखण्यात अपयशी ठरलेल्या बीव्हीजी कंपनीच्या ढिसाळ कारभारावर लोकप्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला. यावर सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी बीव्हीजी कंपनीला काम सुधारण्यासाठी एका महिन्याची शेवटची मुदत (अल्टीमेटम) दिला असून, महिनाभरात स्वच्छता न झाल्यास कंपनीला थेट ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याचे स्पष्ट निर्देश मनपा प्रशासनाला दिले.

सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त धनश्री शिंदे, नगरसचिव मनोज शर्मा, नगररचना विभागाचे अमोल पाटील, शहर अभियंता योगेश बोरोले आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीपासूनच नगरसेवकांनी आरोग्य, भटके कुत्रे, स्वच्छता, अग्निशमन आणि नगररचना विभागाच्या शून्य कामगिरीवरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

बीव्हीजीचे नाव मोठे अन् लक्षण खोटे!

वॉर्ड क्रमांक 5 सह संपूर्ण शहरात बीव्हीजी कंपनी कचरा उचलण्यास प्रचंड दिरंगाई करत असल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी केला. बीव्हीजीचे नाव मोठे अन् लक्षण खोटे अशी सद्यस्थिती आहे. कंपनीवर महापालिका कोट्यवधी रुपये उधळत आहे, तरीही शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या या कंपनीवर दंडात्मक कारवाई का केली जात नाही? असा थेट सवाल लढ्ढा यांनी उपस्थित केला.याला पाठिंबा देत नगरसेवक नितीन सपके यांनी बीव्हीजीच्या अधिकार्‍यांच्या मुजोरीचा पाढा वाचला. नगरसेवकांनी तक्रार केल्यास कंपनीचे अधिकारी अत्यंत निगरगठ्ठपणे घंटागाड्या नादुरुस्त आहेत, दुरुस्त झाल्यावर पाठवू, अशी उत्तरे देतात. लोकप्रतिनिधींना न जुमानणार्‍या या कंपनीला तात्काळ घरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर सभापतींनी बीव्हीजी कंपनीला एका महिन्याचा अल्टीमेटम देत सुधारणा न झाल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला.

अग्निशमन बंब निघण्याच्या मार्गात अतिक्रमाणाचा विळखा

अग्निशमन विभागाच्या गाड्या ज्या ठिकाणी उभ्या राहतात, त्याच मुख्य मार्गावर अतिक्रमणाने विळखा घातला आहे. दिवसभर तेथे वाहने उभी राहत असल्याने आगीची घटना घडल्यास गाड्या बाहेर पडण्यास विलंब होतो, असा गंभीर प्रश्‍न नगरसेवक दीपक सूर्यवंशी यांनी मांडला. सभापतींनी यावर तात्काळ अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.

गाळेधारकांच्या प्रश्‍नावर मंत्र्यांची भेट घेणार

मनपाच्या मुख्य आर्थिक उत्पन्नाचा स्रोत असलेले गाळेधारकांचे प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केली. यावर मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गाळेधारकांच्या प्रश्‍नावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सभापतींनी स्पष्ट केले.

अधिकार्‍यांची उडवाउडवीची उत्तरे

नगरसेवक वार्डातील कामांसाठी आले की, अधिकारी यासाठी आयुक्तांची परवानगी लागते, असे सांगून वेळ मारून नेतात आणि लोकप्रतिनिधींना उडवाउडवीची उत्तरे देतात, अशी खंत नगरसेवक अ‍ॅड.दिलीप पोकळे यांनी व्यक्त केली.

गोलाणी मार्केट आजारांचे माहेरघर

पावसाळा सुरू असल्याने डेंग्यू, मलेरियाचे प्रमाण वाढत आहे. मनपाच्या गोलाणी मार्केटच्या खालच्या मजल्यावर घाण पाण्याचे मोठे डबके साचले असून त्यामुळे रोगराई पसरत असल्याचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी निदर्शनास आणून दिले. यावर सभापतींनी आरोग्य विभागाला शहरात तात्काळ स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश दिले.

नगररचना विभागाच्या अधिकार्‍यावर कारवाई करा

नगररचना विभागाने अद्याप पावतोही ऑडिट सादर केले नसल्याने नगरसेवक नितीन सपके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सभापतींनी सांगितले की, संबंधित विभागाला तब्बल सात पत्रे देऊनही माहिती दिली गेलेली नाही. अधिकारी अमोल पाटील माहिती देण्यास टाळाटाळ करत असून निधी शिल्‍लक किती आहे हे देखील सांगत नाहीत. या बेशिस्त वागणुकीबद्दल पाटील यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश सभापतींनी उपायुक्तांना दिले.

इमारतींचे फायर ऑडिट अनिवार्य

नगरसेवक नितीन सपके यांनी शहरातील खाजगी व्यावसायिक कॉम्प्लेक्स, उंच इमारती आणि कोचिंग क्‍लासेसच्या सुरक्षेचा मुद्दा लावून धरला. अनेक ठिकाणी अग्निशमन यंत्रणाच नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. यावर सभापतींनी शहरात धोकेदायक ठरणार्‍या वास्तूंची तपासणी करून पुढील बैठकीत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश अग्निशमन विभागाला दिले.

 

 

.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment