Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला आहे. २४ तासात जळगाव जिल्ह्यात १०४ मिमी पाऊस झाला आहे तर शहरात ११८ मिमी पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाने कहर केल्याने अनेक नद्यांना पूर आला होता. तसेच भडगाव येथे एकाचा बुडून मृत्यू झाला. तर, दोन जण बेपत्ता आहे. हतनूर धरणाची पाणी पातळी वाढल्याने हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. तसेच जामनेर, पारोळा, भुसावळ , एरंडोल आदी भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहे. आज सकाळी कडक ऊन पडले, जळगावला दि १ ते ४ ऑगस्ट दरम्यान ग्रीन अलर्ट दिला असून पुढील चार दिवस हलका आणि मध्यम पावसाचा अंदाज आहे. गेले दोन दिवस दमदार पाऊस झाल्याने शेतीसाठी पुढील चार दिवस लाभदायक ठरणार आहे. शेतीच्या कामांना गती मिळणार आहे.
देशात सर्वाधिक जामनेरमध्ये २२ सेंमी पाऊस
भारतात सर्वाधिक पावसाची नोंद काल भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ०८३० पासून आज सकाळी ०८३० पर्यंत महाराष्ट्रातील जामनेर तालुक्यात आणि विदर्भातील यवतमाळ येथे २२ सेंमी इतका नोंदवला गेला आहे. जळगाव जिल्ह्यात सेंटीमीटर मध्ये झालेला पाऊस असा आहे, जामनेर तालुक्यात २२, जळगाव- आयएमडी पं.१६, चोपडा १३, पारोळा १२, भुसावळ १२, दहिगाव – एफएमओ ११, एरंडोल १०, राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अत्यंत मुसळधार (≥ २१ सेमी) पावसाची नोंद झाली आहे.
२ ऑगस्ट रोजी असे असेल हवामान
रविवारी रायगड, रत्नगिरी, सिंधुदुर्ग पुणे- सातारा घाट परिसर या पाच ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे. तर, राज्यात सर्वत्र इतर ठिकाणी हलका आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. दक्षिण कोकण – गोव्या त बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस.मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे.
दरम्यान १ ऑगस्टला आज रायगड, पुणे नाशिक घाट परिसराला ऑरेंज अलर्ट दिला आहे, येथे अतिमिसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिकला ऑरेंज आणि नंदुरबारला आज येलो अलर्ट सोडला तर, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगरला ग्रीन अलर्ट म्हणजेच हलका आणि मध्यम पावसाचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान खात्याचा इशारा
*३१ जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान कोकण आणि गोव्यात; ३१ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्रात; ३१ जुलै रोजी मराठवाड्यात; तसेच ३१ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान गुजरात विभाग आणि सौराष्ट्र-कच्छमध्ये बऱ्यापैकी ते सर्वत्र पावसाची शक्यता आहे.
*२ ते ६ ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्रात; १ ते ६ ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात; आणि ३ ते ६ ऑगस्ट दरम्यान गुजरात विभाग व सौराष्ट्र-कच्छमध्ये तुरळक ते काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
*३१ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान गुजरात विभाग आणि सौराष्ट्र-कच्छमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजा चमकण्याची शक्यता आहे.
*३१ जुलै आणि २-३ ऑगस्ट रोजी कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात; ३१ जुलै रोजी मराठवाड्यात; ३१ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान गुजरात विभागात; आणि
३१ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान सौराष्ट्र-कच्छमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच १ ऑगस्ट रोजी कोकण-गोवा व मध्य
महाराष्ट्रात; आणि २ ऑगस्ट रोजी गुजरात विभागात तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.
*३१ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात; आणि ३१ जुलै व १ ऑगस्ट रोजी सौराष्ट्र-कच्छमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार आणि काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
* ३१ जुलै रोजी गुजरात विभागात तुरळक ठिकाणी अपवादात्मक मुसळधार (exceptionally heavy) पावसाची; आणि १ ऑगस्ट रोजी गुजरात विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे









