Jalgaon News: ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष प्रयत्न करावेत. नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि प्रभावी आरोग्य सेवा देताना कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग कार्यकारी समितीची सभा मंगळवारी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक आकाश चौधरी, डॉ. दीपक जाधव, डॉ. विशाल पाटील, डॉ. धापते यांच्यासह आरोग्य विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकांअंतर्गत नमूद विविध बाबींचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये निर्धारित निकषांनुसार आवश्यक असलेल्या सर्व सुविधा व बाबी उपलब्ध असणे आवश्यक असल्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळा व अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या तपासण्या योग्य व प्रभावी पद्धतीने करण्यात याव्यात, यावर विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बालकांमधील विविध आरोग्यविषयक समस्या वेळेत निदर्शनास येऊन त्यांच्यावर आवश्यक उपचार करता यावेत, यासाठी तपासणी मोहिमा अधिक काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश जि.प. सीईओ करिश्मा नायर यांनी दिले.
प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे महत्त्वाचे केंद्र असून ते नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे एक प्रकारचे मंदिर आहे. त्यामुळे या केंद्रांची स्वच्छता, शिस्त, सेवा गुणवत्ता आणि पावित्र्य टिकविणे हे आरोग्य विभागाचे प्रथम कर्तव्य असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी यावेळी नमूद केले. ग्रामीण नागरिकांना वेळेवर, दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी बैठकीत केले.








