bhusawal News: मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी नाशिक व त्र्यंबकेश्वरला होणा-या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागातील नाशिक रोड, देवळाली कॅम्प, ओढा, कसबे सुकेणे आणि खेरवाडी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांची पाहणी केली. या स्थानकांवर सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करताना संबंधित अधिकाऱ्यांना कामांची गुणवत्ता कायम राखून विकास कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश महाव्यवस्थापकांनी दिले.यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ शाखा अधिकारी उपस्थित होते.
कुंभमेळ्याच्या कालावधीत नाशिक परिसरात लाखोच्या संख्येने भाविक व रेल्वे प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रेल्वे स्थानकांवर विविध विकास कामे वेगात सुरू आहेत. प्रवासी सुविधा, पायाभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, गर्दी नियंत्रण, प्रवासी वाहतूक व्यवस्थापन तसेच आपत्कालीन परिस्थितीतील तयारी सुरू आहे. त्यांचा आढावा महाव्यवस्थापकांनी घेतला.
महाव्यवस्थापक श्रीवास्तव यांनी नाशिक रोड, देवळाली कॅम्प, कसबे सुकेणे आणि खेरवाडी स्थानकांना भेट देऊन स्थानकांवर सुरू असलेल्या विविध विकासकामांची तसेच कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रस्तावित व सुरू असलेल्या तयारीची प्रत्यक्ष पाहणी करून कामे त्वरित करण्याबाबत सूचना केली. संबंधित अधिकाऱ्यांनी आपआपल्या रेल्वे स्थानकातील करण्यात आलेल्या उपाययोजना, उपलब्ध सुविधा आणि आगामी काळात आवश्यक असलेल्या अतिरिक्त व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती महाव्यवस्थापकांना दिली.
कुंभमेळ्याच्या कालावधीत देशभरातून मोठ्या संख्येने भाविक नाशिक परिसरात येण्याची शक्यता लक्षात घेता, प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा ही सर्वोच्च प्राथमिकता ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने सर्व तयारी पूर्ण करण्याचे निर्देश महाव्यवस्थापकांनी दिले.










