Savda News: महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू, विमल पानमसाला आणि गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला सावदा पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण १०,२७,७००/- रुपये (दहा लाख सत्तावीस हजार सातशे रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.
घटना अशी
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सावदा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, एका राखाडी (ग्रे) रंगाच्या होंडा अमेझ कारमधून (गाडी क्र. MH-19-CV-4445) प्रतिबंधित गटक्याची चोरटी वाहतूक करून तांदलवाडी फाट्यावरून जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांदलवाडी फाट्याजवळ सापळा रचला. रात्री अकरा वाजेच्या सुमारास संशयित कार येताना दिसताच, पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली. कारचालक सारंग मुरलीधर अवचार (वय ३१, रा. अकलूद, ता. यावल, जि. जळगाव) याच्याकडे चौकशी केली असता, त्याने कारमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याचे कबूल केले.
प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त
पोलिसांनी दोन खाजगी पंचांसमक्ष कारची झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणात विमल पानमसाला, केशरयुक्त पानमसाला आणि तंबाखूचे पाकीट आढळून आले. त्यामध्ये विमल पानमसाला आणि तंबाखूचे वेगवेगळे पाकीट एकूण ५,२७,७००/- रुपये किंमतीचा तर, ५ लाख रुपये किमतीची गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरलेली होंडा अमेझ कार असा एकूण १०,२७,७००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपीची कबुली अन् गुन्हा दाखल
आरोपीने हा प्रतिबंधित माल मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील एका व्यापाऱ्याकडून भुसावळ आणि वरणगाव परिसरात किरकोळ विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नंबर. ०२२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १२३, २७४, २७५, १०६, २२३ आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ चे कलम २६(२)(i), २६(२)(iv), ३०(२)(a), ५९ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोहेका निलेश बाविस्कर आदींनी यशस्वीरीत्या पार पाडली असून पुढील तपास पो. उपनिरीक्षक राहुल सानप हे करत आहेत.









