Varangaon News: भुसावळ तालुक्याच्या तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने अवैध गौण खनिज मुरूम उत्खनन व वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे 3 ब्रास अवैधरित्या उत्खनन केलेले गौण खनिज मुरूम वाहून नेणारा डंपर जप्त केला. या कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वरणगाव शहर आणि परिसरात गौण खनीज माफिया यांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून ते प्रशासनाच्या नाकावर टिचून दिवसा धवढ्या अवैध मुरूमची वाहतूक करतात यावर कायम स्वरुपी अंकुश बसेल का? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, (MH.19.CX.6711) क्रमांकाचा डंपर तळवेल परिसरात अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार महसूल पथकाने सापळा रचून वाहन अडविले.तपासणीअंती वाहनामध्ये सुमारे ३ ब्रास गौण खनिजाचा अवैध साठा आढळून आला. या प्रकरणात आरोपी चालक सतीश गोपाल कोळी (रा.ओझरखेडा) याच्याकडून वाहन ताब्यात घेण्यात आले असून डंपरचा मालक अनिकेत इंगळे (रा.ओझरखेडा तालुका भुसावळ) असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधितांकडे आवश्यक परवाने व वैध कागदपत्रे नसल्याने वाहन जप्त करण्यात आले असून महसूल नियमांनुसार दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई भुसावळ तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव मंडळ अधिकारी रजनी तायडे, पोलीस उपनिरीक्षक जैन, तसेच महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी मनोज म्हस्के,सुधाकर शिंदे,यासीन पिंजारी,प्रशांत ठाकूर आदींच्या उपस्थितीत पार पडली.
महसूल प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की,अवैध उत्खनन व गौण खनिज वाहतुकीला कोणतीही मुभा दिली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असून अशा कारवायांची तीव्रता आणखी वाढविण्यात येणार आहे. या धडक कारवाईमुळे अवैध वाळू व गौण खनिज माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.










